Breaking

Friday, 6 March 2026

सांगोला महाविद्यालयात ‘फायनान्शिअल लिटरसी अँड इन्व्हेस्टमेंट लिटरसी’ विषयावर एकदिवसीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळासंपन्न.

 


सांगोला/प्रतिनिधी ः 



दिनांक 05 मार्च, 2026 रोजी सांगोला महाविद्यालयात ‘फायनान्शिअल लिटरसी अँड इन्व्हेस्टमेंट लिटरसी’ या विषयावर एकदिवसीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयातील वाणिज्य विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षतसेच मेसर्स मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यशाळेस तज्ञ व्याख्यताम्हणून श्री. निनाद रामदासी (व्यवसाय विकास व्यवस्थापक) उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात बचतीचे महत्त्व, आर्थिक स्वातंत्र्य, आर्थिक साक्षरता तसेच महागाई यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच श्री. विकास जाधव (अधिकृत भागीदार आणि शाखा व्यवस्थापक) यांनी आर्थिक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करताना, आपण आर्थिक साक्षर असलो तर विविध फ्रॉड्स व स्कॅमपासून वाचू शकतो, तसेच योग्य नियोजनातून संपत्ती कशी निर्माण करावी याबाबत मार्गदर्शन केले. तर श्री. रणजित जाधव (आर्थिक सल्लागार) यांनी गुंतवणूक व विमा यांचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.

महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रो. डॉ. सुरेश भोसले यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी आर्थिक साक्षरता आत्मसात करून बचत व गुंतवणुकीची सवय लावणे आवश्यक असल्याचे सांगितले. योग्य आर्थिक नियोजन केल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होते, असेही त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा.डॉ. राम पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ. विद्या जाधव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. समाधान माने यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. सचिन सुरवसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. प्राप्ती लामगुंडे यांनी मानले. या कार्यशाळेस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबतच डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथील विद्यार्थ्यांनी ही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागातील प्रा. निकिता लामगुंडे, महाडिक सर तसेच विभागातील सर्व शिक्षक, कार्यालयीन अधीक्षक श्री. विलास माने व श्री. अमर केदार यांचे सहकार्य लाभले.