सांगोला / प्रतिनिधी :
सांगोला येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कारभाराबाबत नागरिकांमध्ये वाढत चाललेली नाराजी दिवसेंदिवस तीव्र होत असून कार्यालयातील कामकाजाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कार्यालयात येणार्या नागरिकांना आवश्यक सेवा वेळेत मिळत नसल्याने शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
मालमत्ता खरेदी-विक्री, दस्त नोंदणी, वारसा नोंद, तसेच विविध कायदेशीर कागदपत्रांच्या नोंदणीसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक कार्यालयात येत असतात. मात्र संबंधित कामांसाठी येणार्या नागरिकांना अनेकदा तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार आहे. काही वेळा आवश्यक कागदपत्रे पूर्ण असतानाही विविध कारणे सांगून कामे पुढे ढकलली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
याशिवाय कार्यालयातील कामकाजाची निश्चित व पारदर्शक पद्धत नसल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. काही एजंटांच्या माध्यमातून कामे लवकर होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असून त्यामुळे सामान्य नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रारही पुढे येत आहे. या परिस्थितीमुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाजाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम व असंतोष वाढत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, कार्यालयातील वाढती गर्दी, अपुरी माहिती व कामकाजातील विलंब यामुळे अनेक वेळा नागरिक व कर्मचार्यांमध्ये वादाचे प्रसंगही घडत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कार्यालयातील व्यवस्थापन अधिक सक्षम व शिस्तबद्ध करण्याची गरज व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर वरिष्ठ महसूल अधिकार्यांनी सांगोला येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाजाची सखोल चौकशी करून नागरिकांना दिल्या जाणार्या सेवांमध्ये पारदर्शकता व गती आणावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. तसेच कार्यालयात येणार्या सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचेही नागरिकांचे मत आहे.
