Breaking

Monday, 30 March 2026

सांगोल्यात आलदर हॉस्पिटलच्या वतीने मोफत बाल आरोग्य शिबिर संपन्न; 45 चिमुकल्यांची तपासणी

 

 


सांगोला (प्रतिनिधी):



वाढत्या उन्हाळ्याचा तडाखा आणि लहान मुलांमध्ये उद्भवणार्‍या आरोग्य समस्या लक्षात घेता, सांगोला येथील नामांकित आलदर हॉस्पिटल (बालरुग्णालय व नवजात शिशु अतिदक्षता विभाग) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिंचोली रोडवरील ‘लिटील मिलेनियम प्रिस्कूल’ येथे पार पडलेल्या या शिबिरात 45 बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात आली.

ग्रामीण व शहरी भागातील मुलांमध्ये वाढणारे आजार, कुपोषण आणि शारीरिक व्याधींवर वेळेत उपचार मिळावेत, या सामाजिक बांधिलकीतून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. जन्मापासून ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची या शिबिरात बालरोग तज्ज्ञांमार्फत सखोल तपासणी करण्यात आली. केवळ तपासणीच नव्हे, तर तपासणीनंतर ज्या बालकांना औषधांची गरज होती, त्यांना हॉस्पिटलच्या वतीने मोफत औषधेही वितरित करण्यात आली.

हे शिबिर ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ आणि ‘प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना’ अंतर्गत राबवण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू पालकांना शासकीय आरोग्य योजनांची माहिती मिळाली, ज्यामुळे भविष्यात मोठ्या उपचारांसाठी त्यांना आर्थिक भार सोसावा लागणार नाही.

याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. आलदर म्हणाले की मुलांचे आरोग्य हीच राष्ट्राची खरी संपत्ती आहे. सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांच्या आहाराकडे आणि आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांच्या किरकोळ वाटणार्‍या आजारांकडेही दुर्लक्ष न करता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी लिटील मिलेनियम प्रिस्कूलच्या कॅम्पस इन्चार्ज पूजा पतंगे, स्वाती मस्के, पल्लवी पांढरे, मयुरी फुले, आरझू शेख आणि योगेश कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच आलदर हॉस्पिटलचे सुनील बुरुंगे, नितीन भोसले यांच्यासह सांगोला परिसरातील बहुसंख्य पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सांगोला शहरात राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वच स्तरातून आलदर हॉस्पिटलचे आणि त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे.