आज भव्य रॅली, खेळाडू सत्कार आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
सांगोला/प्रतिनिधी -
सांगोला शहरात गुरुवार दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती श्री शिवरायांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरासह तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या उत्साहात सहभागी होणार असून दिवसभर विविध उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.
सकाळी 6 वाजता छत्रपती श्री शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 8 वाजता प्रतिमेस दुग्धाभिषेक व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. हा कार्यक्रम सौ. व श्री. योगेश बाबासो खटकाळे व परिवार तसेच सर्व शिवप्रेमी यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
यानंतर सकाळी 9 वाजता सांगोला शहर व तालुक्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेल्या गुणवंत खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. स्थानिक क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सकाळी 10 वाजता सांगोला शहरातून सर्व महापुरुषांना अभिवादन करत भव्य दिव्य भगवी रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत छत्रपती श्री शिवरायांची आकर्षक भव्य मूर्ती, घोडे, हलगी पथक, नाशिक ढोल, उंट, पारंपरिक वेशातील मावळे, लेझीम पथक, दांडपट्टा व मल्लखांबाचे प्रात्यक्षिक यांसारखी विशेष आकर्षणे असणार आहेत.
यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत सांगोला येथील मुकबधीर शाळा व वृद्धाश्रम येथे खाऊ व वह्या वाटपाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
या सर्व कार्यक्रमांना सांगोल्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंती उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
