Breaking

Wednesday, 4 February 2026

महूद जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे दादासाहेब लवटे विरूध्द सांगोला तालुका विकास आघाडीचे बाळासाहेब ढाळे यांच्यामध्ये जोरदार लढत

 


सांगोला/प्रतिनिधी : 




माजी आमदार शहाजी पाटील यांचे होम ग्राउंड असलेल्या महूद जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचे दादासाहेब लवटे विरुद्ध सांगोला तालुका विकास आघाडीचे बाळासाहेब ढाळे यांच्यामध्ये जोरदार लढत होत आहे.शिवसेनेच्या दादासाहेब लवटे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वर्षापूर्वीपासून तयारी केली असल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. 

महूद जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीव आहे.या गटात पाच उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी प्रमुख लढत शिवसेनेचे दादासाहेब लवटे विरुद्ध सांगोला तालुका विकास आघाडीचे बाळासाहेब ढाळे यांच्यात होत आहे. या दोन प्रमुख उमेदवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उत्तम खांडेकर,वंचित बहुजन आघाडीचे गणेश गोडसे व अपक्ष स्वप्नील ढेरे हे इतर तीन उमेदवार आहेत.शिवसेनेच्या दादासाहेब लवटे यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षापूर्वी पासून या भागात प्रचंड जनसंपर्क वाढविला आहे.अत्यंत गरीब कुटुंबातील पंक्चर काढणारा मात्र उच्चशिक्षित तरुण म्हणून त्यांनी आपली ओळख मतदार संघात निर्माण केली आहे.माजी आमदार शहाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुका शिवसेनाप्रमुख म्हणून दादासाहेब लवटे काम पाहत आहेत.तालुका अध्यक्ष म्हणून तालुक्यासह जिल्हा व राज्य पातळीवरील राजकीय नेतृत्व व प्रशासनातील अधिकार्‍यांशी त्यांचा चांगला संवाद व संपर्क आहे. सांगोला तालुक्यातील ज्या सोळा गावांना कोणत्याही योजनेतून पाणी मिळत नाही,अशा गावांना उजनी उचल पाण्याचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी जनआंदोलन उभे केले होते.त्यातूनच बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना मंजूर झाली असून ती पूर्णत्वाकडे नेण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. शहाजी पाटील यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात या गटामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे.नवीन बंधारे, व्यापारी संकुल,पूल अशी विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर झाली असल्याने या विकास कामांच्या जोरावर दादासाहेब लवटे मत मागताना दिसत आहेत.सर्वसामान्यांच्या प्रश्‍नासाठी सदैव सक्रिय असणारा आश्‍वासक चेहरा,तरुणांशी सहज व प्रभावी संवाद साधणारा प्रभावी वक्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

सांगोला तालुका विकास आघाडी कडून महूद गावचे माजी सरपंच बाळासाहेब ढाळे हे निवडणूक लढवत आहेत.नगरपंचायत सदृश्य असलेल्या

महूद सारख्या मोठ्या गावाचा सरपंच म्हणून त्यांना मोठा अनुभव आहे.कासाळगंगा उपनदीच्या पुनरुज्जीवन कामात त्यांनी मोठे योगदान दिले आहे.त्यासाठी मोठी जन चळवळ उभारून त्यांनी या कामाला मूर्त स्वरूप दिले आहे. या कामाची दखल घेऊन केंद्र सरकारचे महूद गावाला नॅशनल वॉटर अवॉर्ड मिळाले आहे.बाळासाहेब ढाळे हे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत प्रतिनिधी असून शेकाप च्या कार्यकर्त्यांचे गावोगावी असणारे घट्ट जाळे,आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याशी थेट संपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे.दूध संस्था व विकास संस्थेचे दीर्घकाळ चेअरमन यामुळे सहकाराचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.त्यांनी कोरोना काळात सरपंच म्हणून प्रभावी काम केले असून सरपंच असताना महूद गावात केलेल्या विविध विकासकामांमुळे त्यांना मोठा अनुभव आहे. महूद जिल्हा परिषद गटातील महूद गणात 19 हजार 259 तर चिकमहूद गणात 18 हजार 845 असे एकूण 38 हजार 104 मतदार आहेत.

महूद पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. यामध्ये शिवसेनेकडून सोनाली उमेश पाटील तर सांगोला तालुका विकास आघाडी कडून मनीषा हरिदास येडगे व शिवसेना (उबाठा) पक्षाच्या दिपाली गाडे या निवडणूक लढवत आहेत. सोनाली पाटील यांचे सासरे विजयसिंह पाटील हे या भागाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते.तर त्यांच्या सासूबाई मीराताई पाटील याही पंचायत समिती सदस्य म्हणून विजयी झाल्या होत्या. पाटील कुटुंबीयांचे महूदच्या समाजकारण,राजकारण व विकासात मोठा सहभाग राहिला आहे.त्यांचे विरोधात शेकापच्या मनीषा हरिदास येडगे याही तुल्यबळ उमेदवार आहेत.

चिकमहूद पंचायत समिती गण नामाप्र साठी राखीव आहे.या गणात शिवसेनेकडून बाळासाहेब बंडगर, सांगोला तालुका विकास आघाडी कडून राकेश कदम तर शिवसेना (उबाठा) पक्षाचे बबन चव्हाण निवडणूक लढवत आहेत.चिकमहूद हे माजी आमदार शहाजी पाटील यांचे मूळ गाव असल्याने या गणातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहाजी पाटील यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर येथे मत मागितले जात आहे. 


 महूद पंचायत समिती गण उमेदवार


सोनाली पाटील (शिवसेना) 

मनीषा येडगे(सांगोला तालुका विकास आघाडी)

दिपाली गाडे (शिवसेना, उबाठा)

 महूद पंचायत समिती गणातील गावे व मतदार 

महूद -11880

ढाळेवाडी -919

कारंडेवाडी - 893

महिम - 4113

खिलारवाडी - 1454

एकूण मतदार - 19259


चिकमहूद पंचायत समिती गणातील उमेदवार 

बाळासाहेब बंडगर (शिवसेना) 

राकेश कदम (सांगोला तालुका विकास आघाडी) 

बबन चव्हाण (शिवसेना, उबाठा)

 चिकमहूद पंचायत समिती गणातील गावे व मतदार 


बंडगरवाडी - 905

चिकमहूद - 5753

कटफळ - 3797

इटकी - 1105

खवासपूर - 3157

जुनी लोटेवाडी - 1217

नवी लोटेवाडी - 1522

सातारकर वस्ती - 1389

एकूण मतदार - 18845

 वाढते नागरीकरण असलेल्या महूद गावात व गटात विविध समस्या 

तालुक्याच्या तुलनेत महूद येथील नागरिकरणाचा वेग जास्त आहे.त्यामुळे महूद गावात मूलभूत सोयी-सुविधांमध्ये अनेक गंभीर प्रश्‍न निर्माण झाले आहेत. पिण्याचे पाणी,सांडपाणी,कचरा व्यवस्थापन यासह आरोग्याचे विविध प्रश्‍न भेडसावत आहेत.त्यातच येथील मुख्य चौकात होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे अनेक गंभीर प्रश्‍न निर्माण झाले आहेत.अशा प्रश्‍नावर नेमकेपणाने काम करण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.