सांगोला/प्रतिनिधी
पत्रकारांच्या कल्याणासाठी भरीव योगदान देणारे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (दादा) यांचा बार्शी येथे सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. पत्रकारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या आरोग्यविषयक गरजांसाठी दिलेल्या आर्थिक सहाय्याबद्दल पत्रकारांनी ग्रामदैवत भगवंताची मूर्ती भेट देत दादांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीचे संचालक तथा ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनाच्या कार्याची दखल घेत मंत्री पाटील यांनी पत्रकारांसाठी मोलाची मदत उपलब्ध करून दिली. त्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या आठ महिन्यांत राज्यभरातील पत्रकारांना सुमारे 17 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. ही मदत पत्रकारांच्या मुलांच्या शैक्षणिक गरजांसाठी तसेच गंभीर आजारांवरील उपचारांसाठी देण्यात आली.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्या सामाजिक व वैयक्तिक आयुष्याची सुरक्षितता आणि स्थैर्य महत्त्वाचे आहे, या जाणिवेतून दादांनी पुढाकार घेतल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.
राज्य प्रसिद्धी प्रमुख धिरज शेळके यांनीही दादांच्या कार्याचे कौतुक करताना, पत्रकारांच्या अडचणी ओळखून तत्परतेने मदतीचा हात देणारे नेतृत्व दुर्मीळ असल्याचे नमूद केले.
या सत्कार सोहळ्याला बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, राष्ट्रीय समन्वयक मुरलीधर चव्हाण, राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले, राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष सूर्यवंशी, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, महिला जिल्हाध्यक्षा निता देव, तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बसवंत तसेच संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि तालुक्यातील पत्रकार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बार्शीतील या कार्यक्रमातून पत्रकार बांधवांची एकात्मता आणि कृतज्ञतेची भावना अधोरेखित झाली असून, पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी उचललेले हे पाऊल राज्यातील पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
