Breaking

Sunday, 15 February 2026

महूद जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या आश्‍वासक चेहर्‍यांचा मोठ्या मताधिक्याने विजय

दादासाहेब लवटे : कामाचा माणूस विजयी 

सांगोला, 


ता. 15 : माजी आमदार शहाजी पाटील यांचे होमो ग्राउंड असलेल्या महूद जिल्हा परिषद गटात मजबूत शिवसेनेच्या विरुद्ध विस्कळीत सांगोला तालुका विकास आघाडी अशी लढत झाली.शहाजी पाटील यांच्या आमदारकीच्या काळात झालेली विकास कामे आणि पुढील विकास कामांसाठी आश्‍वासक चेहरे म्हणून महूद जिल्हा परिषद गटातील मतदारांनी शिवसेनेचे दादासाहेब लवटे,सोनाली पाटील,बाळासाहेब बंडगर यांना एकतर्फी मोठा कौल दिला. दादासाहेब लवटे यांच्या रूपाने महूद जिल्हा परिषद गटातून कामाचा माणूस विजयी झाला आहे.

महूद जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीव होता. या गटात जिल्हा परिषदेसाठी पाच उमेदवार रिंगणात होते. मात्र प्रमुख लढत शिवसेनेचे दादासाहेब लवटे विरुद्ध सांगोला तालुका विकास आघाडीचे बाळासाहेब ढाळे यांच्यातच होती. शिवसेनेचे तालुकाप्रमुख असलेल्या दादासाहेब लवटे यांनी माजी आमदार शहाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षभरा पूर्वीपासून प्रचंड जनसंपर्क वाढविला होता.अत्यंत गरीब कुटुंबातील पंक्चर काढणारा मात्र उच्चशिक्षित तरुण म्हणून त्यांनी आपली ओळख मतदार संघात निर्माण केली होती. व्यासपीठावरून माजी आमदार शहाजी पाटील यांच्या भूमिकेला अतिशय प्रखरपणे पाठिंबा व्यक्त करणारे दादासाहेब लवटे तेवढ्याच सहजपणे सर्वसामान्य नागरिक तरुण यांच्यात मिसळत होते.शिवसेनेचे तालुका प्रमुख या नात्याने तालुक्यासह जिल्हा व राज्य पातळीवरील राजकीय नेतृत्व व प्रशासनातील अधिकारी यांच्याशी त्यांचा चांगला संवाद व संपर्क होता. बाळासाहेब ठाकरे उपसा जलसिंचन योजनेच्या मंजुरीसाठी आणि कार्यवाहीसाठी त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न केले होते.ही योजना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात ते अग्रभागी आहेत. माजी आमदार शहाजी पाटील यांच्या कार्यकाळात या गटामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे झालेली आहेत.वाडीवरील रस्ते, व्यापारी संकुल, पूल, बंधारे अशा विविध विकास कामांच्या जोरावर दादासाहेब लवटे यांच्यासह महूद व चिकमहूद गणातील उमेदवारांनी मतदारांना मतांसाठी आवाहन केले होते. सर्वसामान्यांच्या प्रश्‍नासाठी सदैव सक्रिय असणारा आश्‍वासक चेहरा आणि सहज व प्रभावी संवाद साधणारा प्रभावी वक्ता म्हणून दादासाहेब लवटे यांच्याकडे पाहिले गेले.त्यांच्या या प्रतिमेचा चांगला उपयोग होऊन महूद जिल्हा परिषद गटातून दादासाहेब लवटे हे तब्बल 6323 मतांनी विजयी झाले आहेत.

सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या महूद पंचायत समिती गणामध्ये शिवसेनेच्या सोनाली उमेश पाटील विरुद्ध सांगोला तालुका विकास आघाडीच्या मनीषा हरिदास येडगे यांच्यात थेट लढत झाली.शिवसेनेच्या सोनाली पाटील यांचे दिवंगत सासरे विजयसिंह पाटील,शिवाजीराव पाटील, जयवंतराव पाटील,सासू मीराताई पाटील,धनंजय पाटील या कुटुंबियांचे महूदच्या समाजकारण,राजकारण व विकास कामात मोठा सहभाग राहिला आहे.महूदसह परिसरातील विविध गावांमधील नागरिकांची या कुटुंबीयांवर श्रद्धा व विश्‍वास आहे त्याचा फायदा सोनाली पाटील यांना झाल्याने त्यांनी विकास आघाडीच्या मनीषा येडगे यांच्यावर 2024 मतांनी विजय मिळविला.

नामाप्र साठी राखीव असलेल्या चिकमहूद पंचायत समिती गणामध्ये शिवसेनेचे बाळासाहेब बंडगर विरुद्ध सांगोला तालुका विकास आघाडीचे राकेश कदम यांच्यात थेट लढत झाली. यामध्ये शिवसेनेचे बाळासाहेब बंडगर यांनी राकेश कदम यांच्यावर 1936 मतांनी विजय मिळविला. 

 शहाजी पाटील यांची विकास कामे आणि शिवसेनेकडून आश्‍वासक चेहरे 

शहाजी पाटील यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात महूद गटात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत.या विकास कामाच्या जोरावर मतांसाठी आवाहन करण्यात आले. तर जिल्हा परिषदेसाठी दादासाहेब लवटे, पंचायत समितीसाठी सोनाली पाटील व बाळासाहेब बंडगर या आश्‍वासक चेहर्‍यांना उमेदवारी देण्यात आली. या उमेदवारांनी विकासाचे मुद्दे जनतेपर्यंत पोहोचविले. शिवाय उमेदवारी देताना सोशल इंजिनिअरिंग साधण्यात आली होती. याचा फायदा होऊन तीनही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. 

 विस्कळीत सांगोला तालुका विकास आघाडी 

या गटात उमेदवारी देताना शेकाप कडून लावण्यात आलेल्या निकषामुळे पक्षाच्या अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही.त्यामुळे उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांची नाराजी दूर करण्यात उमेदवारांना शेवटपर्यंत यश आले नाही. ही नाराजी मतदानातून ही दिसून आली आहे. यामुळे शेकापची यंत्रणा पूर्णपणे प्रभावी राबली नाही. त्याचा फटका विकास आघाडीच्या उमेदवारांना बसला. 

 महूद मधील नागरी समस्यांचा निवडणुकीत प्रभाव 

गेल्या अनेक वर्षापासून महूद ग्रामपंचायती मध्ये शेकापची सत्ता आहे. तालुक्याच्या तुलनेत महूद येथील नागरीकरणाचा वेग जास्त आहे.त्यामुळे महूद मध्ये मूलभूत सोयी सुविधांचे अनेक गंभीर प्रश्‍न निर्माण झाले आहेत. गावठाण परिसरातील या प्रश्‍नांवर वाडी वस्तीवरून निवडून आलेले सरपंच प्रभावीपणे काम करत नाहीत अशी भावना ग्रामस्थांमध्ये आहे.त्याचा थेट परिणाम या मतदानावर झाल्याचे दिसून येते.महूद येथील पिण्याचे पाणी, सांडपाणी,कचरा व्यवस्थापन, आरोग्याचे प्रश्‍न,मुख्य चौकातील वाहतूक कोंडी अशा अनेक नागरिक प्रश्‍नांवर काम होणे अपेक्षित आहे.


 शिवसेनेची प्रभावी प्रचार यंत्रणा 


शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार दादासाहेब लवटे यांनी या गटात अत्यंत नियोजनबद्ध प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली. गटातील सर्व गावांमध्ये त्यांनी व इतर दोन उमेदवारांनी व्यक्तिशः संपर्क केला.प्रचार यंत्रणेसाठी मोबाईल प या आधुनिक यंत्रणेचा वापर केला. शिवाय शिवसेनेचा वासुदेव,पोस्टमन यांच्या वेशातील प्रचार यंत्रणा घरोघरी पोहोचली होती. पथनाट्याच्या माध्यमातून गावोगावीच्या समस्या व त्यावरील उपाय त्यांनी प्रभावी मांडले होते.

 महूद जिल्हा परिषद गटावर शिवसेनेचे एक हाती वर्चस्व 

शिवसेनेच्या दादासाहेब लवटे यांनी आघाडीच्या बाळासाहेब ढाळे यांच्यावर 6323 मतांनी विजय मिळविला. ढाळेवाडी व इटकी या दोन मतदान केंद्रावर फक्त ढाळे यांना मताधिक्य मिळाले. याउलट लवटे यांना महिम मध्ये 846, महूद मध्ये 1945, खिलारवाडीत 111 असे एकूण महूद गणात 2902 मताधिक्य मिळाले. कटफळ येथे 523, खवासपूर मध्ये 464,सातारकरवस्ती जुनी व नवी लोटेवाडी मध्ये मिळून 790 तर चिकमहूद मध्ये 1655 असे चिकमहूद गणात 3421 मताधिक्य मिळाले.महूद गणातील सोनाली पाटील यांना महिम मध्ये 368, महूद येथे 1620 तर खिलारवाडीत 36 असे 2024 मतांचे मताधिक्य मिळाले. चिकमहूद गणातील बाळासाहेब बंडगर यांना कटफळ मध्ये 489, खवासपूर मध्ये 314, सातारकर वस्ती जुनी व नवीन लोटेवाडी मिळून 607 तर चिकमहूद मध्ये 625 मतांचे असे एकूण 1936 मतांचे मताधिक्य मिळाले आहे.



- दादासाहेब लवटे : कामाचा माणूस विजयी 


शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादा लवटे हे अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व आहे.व्यासपीठावरून शिवसेना व माजी आमदार शहाजीबापू पाटील यांची भूमिका अतिशय आक्रमकपणे मांडणारे दादासाहेब लवटे समाजाच्या व सर्वयोगटाच्या घटकांमध्ये सहजपणे मिसळतात.आपल्या नम्र बोलल्याने सर्वांशी लगेच एकरूप होतात. निवडणूक काळात लहानांनपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्या तोंडी दादा लवटे हे नाव होते. असा हा कामाचा माणूस जिल्हा परिषद गटातून निवडून आल्याने सर्वसामान्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. 

 सोशल मीडियावर पसरविलेल्या अफवांचा परिणाम नाही 

निवडणूक काळात शिवसेनेचे उमेदवार दादा लवटे यांच्याबाबत अनेक दृकश्राव्य रूपातील अफवा पसरविण्यात आल्या. यामध्ये दादा लवटे सर्वसामान्य नागरिकांना दमदाटी करून दहशत पसरवत असल्याचा आरोप करण्यात आला.भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबाबत त्यांचे वक्तव्य पसरवून ते विशिष्ट समुदायाच्या विरोधात आहेत,असा प्रचार करण्याचा प्रयत्न केला गेला. शेवटी-शेवटी तर दादा लवटे हे भाजपाच्या जवळील उमेदवार असल्याचे सांगून विरोधकांनी त्यांचा मतदार तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही प्रचाराचा परिणाम महूद जिल्हा परिषद गटातील मतदारांवर झाला नाही.

-------------