सांगोला/प्रतिनीधी :
तालुक्यातील जुनोनी हद्दीत नॅशनल हायवे 166 वर झालेल्या भीषण अपघातात पाचेगाव खुर्द येथील 35 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 144/2026 दाखल करण्यात आला आहे.
दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास सुदर्शन पेट्रोल पंपाजवळ, करंडेवाडी फाटा, जुनोनी हद्दीत हा अपघात घडला. आरोपी सिद्राम संजय आयवळे (वय 23, रा. मजरेवाडी, सोलापूर) याने त्याच्या ताब्यातील चिव्होरलेट कंपनीची चारचाकी (क्र. एमएच 02-बीएम 0815) भरधाव व निष्काळजीपणे चालवत मोटारसायकल (क्र. एमएच 45 ए ए 0535) ला पाठीमागून जोराची धडक दिली.
या अपघातात मोटारसायकल चालक अजय रघुनाथ भंडारे (वय 35, रा. पाचेगाव खुर्द, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांना गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. मोटारसायकलीचे सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी विजय रघुनाथ भंडारे (वय 28) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीएनएस कलम 281, 106(1), 324(4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताच्या तपासानंतर गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकॉ 152 घोंगडे करीत आहेत, तर गुन्हा दाखल पोहेकॉ 1394 जाधव यांनी केला आहे.
