Breaking

Friday, 6 February 2026

274 मतदान केंद्रांवर मतदान पेट्या पोहोचल्या

 

सांगोला येथे मतदानासाठी प्रशासन सज्ज

सांगोला प्रतिनिधी :




जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्‍वभूमीवर सांगोला तालुक्यातील मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. आज दि. 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह, सांगोला येथून तालुक्यातील 274 मतदान केंद्रांसाठी मतदान पेट्या व निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले.

या प्रक्रियेचे नियोजन निवडणूक निरीक्षक अरुण आनंदकर, निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. एकूण 14 टेबल्सद्वारे 274 मतदान केंद्रांवर मतदानासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य वितरित करण्यात आले.

वाटप करण्यात आलेल्या साहित्यामध्ये बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, मतदार यादी, शिक्के, पिंक पेपर, पट्टी सील, स्पेशल ड्रेस टॅग तसेच गट व गणासाठी प्रदत्त मतपत्रिका व इतर निवडणूक साहित्य यांचा समावेश होता, अशी माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत (पंचायत समिती सांगोला) यांनी दिली.

मतदान प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झाले असून, मतदान पेट्यांचे वितरण सुरळीत व वेळेत करण्यात आले. सर्व मतदान पेट्या संबंधित केंद्रांवर सुरक्षितरित्या पोहोचवण्यासाठी पोलीस निरीक्षक विनोद घुगे व पोलीस उपनिरीक्षक पवन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तसेच मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी किरकोळ उपचार व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप देवकते यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. यामध्ये के. डी. बोत्रे (आरोग्य सहायिका), एस. डी. क्षीरसागर (आरोग्य सहाय्यक), चिमू घाडगे (आरोग्य सेविका), सना सय्यद (सीएचओ), वसीम शेख (सीएचओ) व राहुल नरोटे (आरोग्य सेवक) यांचा समावेश होता.

दरम्यान, दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार्‍या मतदानासाठी सांगोला तालुक्यात एकूण 2 लाख 62 हजार 367 मतदार असून, त्यामध्ये पुरुष मतदार 1 लाख 35 हजार 923, महिला मतदार 1 लाख 26 हजार 440 व इतर 4 मतदार आहेत. मतदानासाठी नेमण्यात आलेले 1,370 अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले असून, त्यांना 42 एसटी बसेस व 2 जीपद्वारे संबंधित केंद्रांवर पोहोचवण्यात आल्याची माहिती वाहतूक नोडल अधिकारी महेश जाधव (मंडल अधिकारी, सांगोला) यांनी दिली.

निवडणूक प्रक्रियेत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपापली नेमून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे, निर्भय व प्रामाणिकपणे पार पाडावी, अशा स्पष्ट सूचना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सांगोला बाळूताई भागवत यांनी दिल्या आहेत.