सांगोला/प्रतिनिधी :
सांगोला पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू उपसा व वाहतूक करणार्यांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण 10 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाया पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या असून त्यांच्या धडाडीच्या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
पहिली कारवाई दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चिनके येथील माण नदी पात्राकडे जाणार्या रस्त्यावर करण्यात आली. पोलिसांनी गस्त घालत असताना तानाजी महादेव शितोळे (वय 25, रा. चिनके) हा आरोपी पांढर्या रंगाच्या बोलेरो पिकअप वाहन (क्रमांक चक 10 इठ 0227) मधून शासनाची रॉयल्टी न भरता बेकायदेशीर वाळू वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अंदाजे 5 लाख रुपये किंमतीचे वाहन व 7 हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाळू असा एकूण 5 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (2) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9 व 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भानवसे करीत आहेत.
दरम्यान, दुसरी कारवाई दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास नवी लोटेवाडी येथील पाटील वस्ती परिसरात करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अतुल खराडे यांच्या फिर्यादीवरून बंटी कांबळे (रा. महुद, ता. सांगोला) व त्याच्या दोन अज्ञात साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303 (2), 3 (5) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9 व 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा पांढर्या रंगाच्या विनानंबर चारचाकी वाहनातून बेकायदेशीर वाळू वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले असता त्यामध्ये एक ब्रास वाळू आढळली. जप्त करण्यात आलेल्या वाहनाची किंमत अंदाजे 5 लाख रुपये असून वाळूची किंमत 7 हजार रुपये आहे. असा एकूण 5 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र, आरोपी व त्याचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाले. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजगे करीत आहेत.
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगितले की, सांगोला तालुक्यात अवैध वाळू उपसा, वाहतूक व इतर बेकायदेशीर धंद्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पोलिसांच्या या ठाम भूमिकेमुळे अवैध धंदे करणार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
