Breaking

Thursday, 1 January 2026

नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग : पूर्वीच्या आरेखणालाच शेतकर्‍यांचा ठाम पाठिंबा

 

सांगोला । प्रतिनिधी



महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प पूर्वी ज्या आरेखणानुसार निश्‍चित करण्यात आला आहे, त्यामध्ये कोणताही बदल करू नये, अशी ठाम व सकारात्मक भूमिका सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी घेतली आहे.

दि. 7 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार बार्शी, मोहोळ, पंढरपूर व सांगोला या तालुक्यांतून महामार्गाचे आरेखण निश्‍चित करण्यात आले असून, त्यानुसार प्रत्यक्ष जमिनीवर सिमांकन व मोजणीचे काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाले आहे. मोहोळ व पंढरपूर तालुक्यात मोजणी पूर्ण झाली असून, बार्शी व सांगोला तालुक्यातील सुमारे 75 ते 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.

हा महामार्ग दुष्काळी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी, दळणवळण सुलभ करण्यासाठी तसेच उद्योग, रोजगार व नव्या पिढीसाठी संधी निर्माण करणारा ठरणार असल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या विश्‍वासाने या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. अनेक ग्रामपंचायतींनी समर्थनार्थ ठराव मंजूर करून भूसंपादन अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले आहेत.

महामार्गाच्या अधिसूचनेनंतर संबंधित जमीन पडीक राहिल्याने शेतकर्‍यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले असले, तरीही योग्य मोबदला मिळाल्यास भूसंपादनास शेतकर्‍यांची पूर्ण तयारी असल्याचे या निवेदनातून स्पष्ट होते.

विशेष म्हणजे, या पूर्वीच्या आरेखणात पंढरपूर (दक्षिण काशी) व सांगोल्याची अंबिकादेवी यांसारखी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे महामार्गाशी जोडली जात होती. त्यामुळे धार्मिक, सांस्कृतिक व पर्यटन विकासालाही चालना मिळणार होती.

अशा परिस्थितीत महामार्गाचे आरेखण बदलल्यास आधीच संपादन प्रक्रियेत सहभागी झालेल्या शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार असल्याने, पूर्वीच्या आरेखणात कोणताही बदल न करता भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी शासनाकडे केली आहे.

निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी सोलापूर, तसेच संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकार्‍यांना देण्यात आली असून, शासनाने शेतकर्‍यांच्या या सकारात्मक भूमिकेची दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.