सांगोलाा प्रतिनिधी
राजुरी गावातील तलाठी कार्यालयात सुरू असलेल्या मनमानी कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकरी, ग्रामस्थ व सामान्य नागरिकांना साध्या महसूल कामांसाठीही वारंवार हेलपाटे मारावे लागत असून तलाठी कार्यालयात कोणतीही शिस्त अथवा ठराविक वेळेचे पालन केले जात नसल्याचे चित्र आहे.
जमिनीच्या नोंदी, फेरफार, 7/12 उतारे, दाखले आदी कामांसाठी गेलेल्या नागरिकांना टाळाटाळ केली जात असून अनेकदा उद्या या, सध्या वेळ नाही अशा उत्तरांमुळे लोक त्रस्त झाले आहेत. काही नागरिकांनी तलाठी कार्यालयात वेळेवर उपस्थिती नसणे, अर्ज प्रलंबित ठेवणे तसेच नियमबाह्य पद्धतीने कामकाज केल्याचा आरोप केला आहे.
विशेष म्हणजे, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कामांबाबत विचारणा केली असता नागरिकांशी उद्धटपणे वागणूक दिली जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे राजुरी ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने लक्ष घालून चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
जर या प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले, तर ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. महसूल विभागाने नागरिकांच्या सेवेसाठी असलेली यंत्रणा शिस्तबद्ध व पारदर्शक ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
