सांगोला । प्रतिनिधी
अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात सांगोला पोलिसांनी कारवाई करत टाटा एन्ट्रा कंपनीचा चारचाकी टेम्पो व वाळूसह सुमारे 2 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगोला पोलीस ठाणे भाग 5 अंतर्गत गु.र.नं. 15/2026 नुसार बी.एन.एस. 2023 चे कलम 303(2) सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 9 व 15 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी मारुती पांढरे (वय 37), नेमणूक सांगोला पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीचे नाव ऋतेष दत्तात्रय पाटील (रा. सावे, ता. सांगोला) असे आहे.
दिनांक 07 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास, गणेश नामदेव बनसोडे यांच्या शेताजवळ, बामणी ते सावे जाणार्या रस्त्यावर, आरोपी हा कोणतीही शासकीय रॉयल्टी न भरता व परवानगी न घेता अवैधरित्या वाळू उपसा करून ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान वाहन पंक्चर झाल्याने तो थांबला असता, परिसरातील लोक येताच वाहनाची चावी घेऊन आरोपी फरार झाला.
पोलिसांनी घटनास्थळी निळ्या रंगाचा टाटा एन्ट्रा कंपनीचा चारचाकी टेम्पो (चेसिस नं. च-ढ535073चधउ16541, इंजिन नं. 1.5उठ-खङ05उधदड30406) जप्त केला. टेम्पोच्या मागील हौद्यात अंदाजे अर्धा ब्रास वाळू आढळून आली. टेम्पोसह वाळूची एकूण किंमत अंदाजे 2,04,000 रुपये आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक कदम करीत असून गुन्हा पोहेकाँ/1242 बनसोडे यांनी दाखल केला आहे. अवैध वाळू वाहतुकीविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
