Breaking

Wednesday, 7 January 2026

पत्रकार व पोलीस यांच्यात सुसंवादातूनच समाजहित साध्य - पोलीस निरीक्षक विनोद घुगे

 

सांगोला । प्रतिनिधी



राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सांगोला पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी उपस्थित पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधत पत्रकारितेचे महत्त्व आणि प्रशासन-माध्यम यांच्यातील सुसंवादाची गरज अधोरेखित केली.

घुगे म्हणाले की, 6 जानेवारी 1832 रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री (बाळकृष्ण) जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे भारतातील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून या आधारस्तंभावर समाजाच्या जडणघडणीची मोठी जबाबदारी आहे.

पत्रकार म्हणून आपण समाजाला काय देतो, माणूस म्हणून कसे वागतो, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आपल्या आचरणातून चांगुलपणा जोपासला, तर उत्तम समाज आणि सुदृढ गाव निर्माण होऊ शकते, असे ते म्हणाले. प्रशासनात काम करत असताना आम्हीही माणूसच आहोत आणि पत्रकारही माणूसच आहेत. माणसाकडून चुका होऊ शकतात; त्या चुका वेळेवर निदर्शनास आणून दिल्या, तर प्रशासन त्या दुरुस्त करून पुढील कामकाज अधिक प्रभावीपणे करू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काम करताना कधी कधी गैरसमज निर्माण होतात; मात्र पत्रकार व प्रशासन यांच्यात सुसंवाद राहिला, तर बदल घडवून आणता येतो. कोणीही फोन केला तर मी तो उचलतो आणि जेवढे शक्य असेल तेवढे काम करण्याचा प्रयत्न करतो, असे सांगत घुगे यांनी पारदर्शकतेवर भर दिला.

जीवनाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, माणसामध्ये आई-वडील, मित्रमंडळी आणि समाजाचे संस्कार असतात. शेवटच्या क्षणी ‘आपण समाजासाठी काहीतरी चांगले केले’ असे समाधान मिळाले पाहिजे. प्रत्येक क्षण समाजहितासाठी अधिक चांगले कसे वागता येईल, या भावनेतून वागलो तर सर्व गोष्टी योग्य दिशेने जातील, असा संदेश त्यांनी दिला.

या कार्यक्रमामुळे पत्रकार आणि पोलीस प्रशासन यांच्यातील नाते अधिक दृढ होऊन समाजहितासाठी सकारात्मक सहकार्य घडेल, असा विश्‍वास उपस्थितांनी व्यक्त केला.

 पत्रकारांच्या सन्मानासाठी आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार सतीश भाऊ सावंत यांनी पोलीस प्रशासन व पत्रकारांमधील परस्पर सुसंवादाचे महत्त्व अधोरेखित केले. गेली 30 वर्षे पत्रकारिता करत असताना पोलीस व पत्रकारांमध्ये प्रत्येक बाबतीत नेहमीच सकारात्मक समन्वय राहिला असल्याचे त्यांनी सांगितले.

हा सुसंवाद व विश्‍वासाचे नाते पुढील काळातही कायम ठेवून समाजहितासाठी चांगली, प्रामाणिक व जबाबदार पत्रकारिता करावी, असे आवाहन सावंत यांनी उपस्थित पत्रकार बांधवांना केले.