Breaking

Friday, 9 January 2026

डॉ. परेश खंडागळे यांचा पत्रकारांशी संवाद व स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न

 

भाजपवर नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारीचे संकेत

सांगोला । प्रतिनिधी

सांगोला तालुक्यातील सामाजिक,
वैद्यकीय व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले डॉ. परेश खंडागळे यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधण्यासाठी व स्नेहभोजनासाठी हॉटेल सितारा, कडलास रोड, सांगोला येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास तालुक्यातील विविध माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. परेश खंडागळे म्हणाले की, माझ्या आजवरच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत पत्रकार बांधवांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. आगामी काळात राजकीय, सामाजिक व वैद्यकीय विषयांवर आपल्याशी सातत्याने संवाद ठेवण्याची माझी इच्छा आहे.

डॉ. खंडागळे यांनी यावेळी आपली आगामी राजकीय भूमिका स्पष्ट करत सांगितले की, मी जवळा जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माझा प्रचार हा केवळ निवडणूक काळापुरता मर्यादित नसून, गेली दहा वर्षे मी जवळा गटातील प्रत्येक गावातील नागरिकांशी सातत्याने संपर्कात आहे. वैद्यकीय सेवा, सामाजिक उपक्रम तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मी नेहमीच जनतेच्या संपर्कात राहिलो आहे.

युवापिढीशी असलेला आपला घट्ट संबंध अधोरेखित करत ते म्हणाले की, निवडणूक लागली की संपर्क साधणारे अनेक नेते असतात; मात्र मी तात्पुरता नव्हे तर कायमस्वरूपी जनतेसोबत राहणारा कार्यकर्ता आहे. मी कायम मदत करत आलो आहे आणि पुढेही करत राहणार आहे.

भाजप पक्षाबाबत नाराजी व्यक्त करताना डॉ. खंडागळे म्हणाले की, 2014 पासून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपसाठी प्रामाणिकपणे काम केले. तालुक्यात जास्तीत जास्त सभासद नोंदणीचे काम केले. तत्कालीन तालुका अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासोबत प्रत्येक बैठकीस उपस्थित राहिलो. वरिष्ठांशीही चांगले संबंध होते. मात्र सध्याच्या काळात कोणत्याही बैठकीस बोलावले जात नाही, पदाधिकार्‍यांच्या निवडीतून वगळले जात आहे. वरिष्ठांशी चर्चा होऊनही याची दखल घेतली जात नाही, याची खंत आहे.

पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चा सुरू असून पुढील दोन ते तीन दिवसांत याबाबत अंतिम निर्णय समोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकारांशी मुक्त संवाद साधत स्नेहभोजनाचा कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला.