सांगोला / प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रक्रियेसाठी मुदतवाढ मागितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यास दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणुका पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ मंजूर करत 15 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
या निर्णयामुळे राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर गती मिळणार असून, लोकशाही प्रक्रियेला चालना मिळेल. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमुळे स्थानिक पातळीवरील विकासकामे आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेला वेग मिळण्याची अपेक्षा आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून आता निवडणूक कार्यक्रम जाहीर करून मतदान प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी हालचालींना वेग देण्यात येणार आहे.
