Breaking

Tuesday, 16 December 2025

नगरपालिकेच्या लाईट विभागात सावळा गोंधळ; भ्रष्टाचार व मनमानी कारभाराने नागरिक त्रस्त

सांगोला । प्रतिनिधी



नगरपालिकेच्या लाईट (विद्युत) विभागात सध्या सावळा गोंधळ माजल्याचे चित्र आहे. शहरातील रस्ते दिवे वारंवार बंद पडणे, दुरुस्ती कामात दिरंगाई, निकृष्ट साहित्याचा वापर आणि अनियमित खर्च यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विभागातील काही अधिकार्‍यांकडून नियमांना डावलून हम करे सो कायदा अशा पद्धतीने कारभार केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

लाईट दुरुस्ती, नवीन खांब उभारणी व केबल टाकणे या कामांत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी वाढल्या असून, प्रत्यक्ष काम न होता बिले काढली जात असल्याचे आरोप आहेत. अनेक ठिकाणी महिनोन्महिने स्ट्रीट लाईट बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत.

या सर्व प्रकारामुळे नगरपालिकेच्या प्रशासनावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. शहरातील लाईट व्यवस्था तत्काळ सुरळीत करून पारदर्शक कारभार राबवावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.