नातेपुते प्रतिनिधी-
: अकलूज नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये गेल्या ७० वर्षांपासून अकलूजमधील राजकीय व्यवस्थेवर असलेल्या मोहिते-पाटलांच्या वर्चस्वाला यंदा भारतीय जनता पार्टीने जोरदार आव्हान देऊन.अकलूज नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रस्थापित व्यवस्थेविरोधात भाजपाने 'कमळ' चिन्हावर आपले पॅनल उभे करून निकराची लढत दिली. जरी पूर्ण सत्ता मिळाली नसली, तरी मिळालेला जनादेश हा आमचा म्हणजेच भाजप चा 'नैतिक विजय' असून हा प्रस्थापितांच्या पतनाचा प्रारंभ आहे असे मत माळशिरस विधानसभेचे मा. आमदार राम सातपुते यांनी अकलूज येथील पत्रकार परिषद व्यक्त केले
यावेळी भाजप अकलूज मंडळ अध्यक्ष सुजयसिंह माने पाटील,शहर अध्यक्ष महादेव कावळे, शैलेश कोतमिरे,नूतन नगरसेवक राहुल लोंढे, महेश शिंदे, नगरसेविका दिपाली वाघमोडे,जयश्री एकतपुरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश सपकाळ, पी आर पी चे सोमनाथ भोसले आधी भाजप व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
सातपुते पुढे म्हणाले या निवडणुकीत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. पूजाताई कोतमीरे यांना अकलूजच्या जनतेने सुमारे १० हजार मतांचा भरघोस कौल दिला.विजयी उमेदवाराला ५१ टक्के मते मिळाली असली, तरी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने ४१ टक्क्यांहून अधिक मते मिळवून विरोधकांच्या गोटात धडकी भरवली आहे. अनेक प्रभागांमध्ये भाजपाचे उमेदवार अवघ्या २० ते ३० मतांच्या फरकाने पराभूत झाले विरोधांकडे दोन साखर कारखाने, आमदार, खासदार आणि माजी उपमुख्यमंत्र्यांची फौज होती. तरीही त्यांना विजयासाठी गल्लीबोळात फिरावे लागले आणि पैशांचा वापर करावा लागला. हा विजय म्हणजे एखादा पेशंट 'आयसीयू' मधून 'जनरल वार्ड' मध्ये शिफ्ट झाल्यासारखा आहे. त्यांची सत्ता आता खिळखिळी झाली आहे."
तरी इथून पुढे,कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले आणि राऊत नगरमधील दगडफेकीसारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. संविधानाच्या मार्गाने या विकृत राजकारणाचा प्रतिकार केला जाईल.अकलूजमध्ये लवकरच भाजपाचे भव्य कार्यालय सुरू होणार असून, नगरसेवक तिथे जनतेच्या कामासाठी उपलब्ध असतील.बांधकाम परवाने किंवा जमिनींचे दाखले यासाठी अकलूजच्या जनतेला एक रुपयाही कोणाला द्यावा लागणार नाही, याची काळजी भाजपाचे चारही नगरसेवक घेतील असे सांगण्यात आले
यावेळी या लढ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या पाठबळाबद्दल त्यांचे आभार मानत "ही केवळ निवडणुकीची सांगता नसून, अकलूजमधील नव्या पर्वाची सुरुवात आहे," असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
