Breaking

Monday, 29 December 2025

सोनंद सब स्टेशन अंतर्गत दिवसभर भारनियमन; शेतकरी-नागरिक त्रस्त

 


महावितरणने तात्काळ उपाययोजना न केल्यास स्वराज्य संघटनेचा टाळेठोक आंदोलनाचा इशारा

सांगोला/प्रतिनिधी :



सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागात, विशेषतः सोनंद सब स्टेशन अंतर्गत येणार्‍या गावांमध्ये व वाड्या-वस्त्यांवर महावितरणकडून दिवसभर भारनियमन सुरू असल्याने शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अचानक व दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित केल्यामुळे शेती, घरगुती कामकाज तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षण यावर प्रतिकूल परिणाम होत आहे.

सध्या ज्वारी पिकाचा महत्त्वाचा टप्पा असून पाण्याची अत्यंत गरज आहे. मात्र दिवसा वीज बंद ठेवून रात्री उशिरा वीजपुरवठा सुरू केल्याने शेतकर्‍यांना पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. थंडीचे दिवस सुरू असताना रात्री वीज येत असल्याने रात्री अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागत असून त्यामुळे शेतकर्‍यांना थंडीत परिश्रम करावे लागत आहेत. 

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही पूर्वसूचना न देता भारनियमन केले जात असून कधी काही तास तर कधी संपूर्ण दिवस वीज बंद राहते. त्यामुळे पंपसेट, दुग्धव्यवसाय, छोटे व्यावसायिक तसेच विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे वेळापत्रक कोलमडले आहे.

या संदर्भात स्वराज्य संघटनेचे सांगोला विधानसभा संघटक प्रमोद काशीद यांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आधीच निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत महावितरणकडून दिवसभर भारनियमन करून शेतकर्‍यांवर अन्याय केला जात आहे. हा प्रकार तात्काळ थांबवण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

महावितरणने त्वरित भारनियमन बंद करून सुरळीत व नियमित वीजपुरवठा सुरू न केल्यास स्वराज्य संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयाला टाळेठोक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रमोद काशीद यांनी दिला आहे.

दरम्यान, संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.