भाजप नेते बाळासाहेब एरंडे यांच्या पाठपुराव्याला यश
सांगोला :
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 संशोधन व विकास अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून, यामध्ये सांगोला तालुक्यातील एकूण 12 रस्ते कामांना 61 कोटी 69 लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. या सर्व कामांसाठी पाच वर्षांची देखभाल व दुरुस्तीची तरतूदही करण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण मंजुरीसाठी भारतीय जनता पक्षाचे नेते बाळासाहेब एरंडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नातून सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते दर्जेदार व मजबूत होणार असून, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत अजनाळे ते नाझरे, गौडवाडी ते तिप्पेहळ्ळी, नाझरे-बनसोडेवाडी ते चोपडी, जुजारपूर ते हाकेवस्ती जुनोनी, झापाचीवाडी, सोनलवाडी-कारखाना, कारंडेवस्ती, शिवणे (म्हसोबा देवस्थान) ते खडतरेवस्ती, पाचेगाव (खुर्द) ते राजुरी, हातीद ते बुद्धेहाळ, पांढरेवस्ती आदी प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. एकूण 49.78 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची सुधारणा या कामांमधून होणार आहे.
ग्रामीण भागातील रस्ते खराब असल्याने दळणवळण, आरोग्यसेवा, शैक्षणिक सुविधा तसेच कृषी माल वाहतूक यामध्ये अडथळे येत होते. आता या रस्त्यांच्या दर्जोन्नतीमुळे सांगोला तालुक्याचा विकास वेग घेईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या मंजुरीबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, सांगोला तालुक्याच्या विकासासाठी बाळासाहेब एरंडे यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
सांगोल्याला निधी कमी पडू देणार ससल्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्रीची माहिती - सांगोला तालुक्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सांगोला शहर व तालुक्यातील नागरिकांच्या वतीने विशेष आभार भाजपचे नेते एरंडे यांनी मानले. यापुढेही सांगोला तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी दिल्याची माहितीही भाजपचे नेते बाळासाहेब एरंडे यांनी दिली.
