अजनाळे येथे तालुका विधि सेवा समिती व विधीज्ञ संघाच्या वतीने कायदेविषयक शिबिर व फिरते लोकन्यायालय कार्यक्रम संपन्न...
सांगाेला प्रतिनिधी
न्याय हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. त्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता असणे आणि न्यायव्यवस्था सर्वसामान्यांच्या दारी पोहोचणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन दि.न्या.क. स्तर तथा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी सौ. पी. आर. कुलकर्णी यांनी केले.
काल शनिवार दि 15 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत सभागृह अजनाळे येथे तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ संघ, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने अजनाळे येथे आयोजित करण्यात आलेल्या कायदेविषयक शिबीर व फिरत्या लोकन्यायालय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम प्रसंगी सरपंच दिपाली लाडे, अॅड व्ही एस गायकवाड, श्रीमती अॅड एच डी मेनकुदळे, साह्यक गटविकास अधिकारी वसंत फुले, माजी उपसरपंच अर्जुन येलपले,मिलिंद सावंत, निखिल बाबर, संतोष जी, ग्रामविकास अधिकारी संदीप सरगर, उपसरपंच संतोष शिंदे, ग्रामपंचायत सदस्य महादेव भंडगे, यांच्यासह अन्य सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना श्रीमती पी आर कुलकर्णी आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या की, नागरिकांनी विविध कायदे, शासनाच्या योजना, मोफत कायदेशीर मदत, महिला व बालकांसाठी असलेल्या सुरक्षा तरतुदी, वरिष्ठ नागरिक संरक्षण कायदा, घरगुती हिंसा प्रतिबंधक कायदा, तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी उपलब्ध न्यायसहाय्य यांविषयी विस्तृत माहिती दिली लोकन्यायालयांमुळे वाद-विवाद त्वरित निकालात काढता येतात. दीर्घकालीन खर्च, वेळ आणि मानसिक तणाव यापासून नागरिकांची बचत होते. छोटे-मोठे वाद गावच्या पातळीवरच सोडवण्याच्या दृष्टीने फिरते लोकन्यायालय अत्यंत उपयुक्त असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अॅड बनसोडे यांनी मानले. या कार्यक्रमाला तालुका विधि सेवा समितीचे सदस्य विधिज्ञ संघाचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराच्या दरम्यान गावातील जमिनीचे वाद, कौटुंबिक तक्रारी, कर्जासंबंधी तक्रारी, कागदपत्रांशी निगडित प्रश्ननावर अशा अनेक मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली..
