*डाळिंब बागांसह कृषी यांत्रिकीकरणामधील लाभधारक शेतकर्याच्या ट्रॅक्टरची केली पाहणी
सांगोला/ प्रतिनिधी :
सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दि. 25 नोव्हेंबर 2025 रोजी जुनोनी मंडळ मधील चोपडी गावातील विविध ठिकाणी भेट देऊन कृषी यांत्रिकी योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व अवजारांची तपासणी केली. चालू हंगामात बहार धरलेल्या प्रगतशील शेतकरी सतीश पाटील यांच्या बागेची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. चोपडी येथील संतोष डोंगरे यांच्या डाळींब तोडणी चालू असलेल्या बागेस भेट देऊन डाळींब काढणीपश्चात व्यवस्थापन तंत्रज्ञान (पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी) या विषयावर उपस्थित शेतकर्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. तसेच केशरमाती कृषी उद्योग फर्मचे सर्वेसर्वा सतीश पाटील यांच्या डाळिंब बागेस भेट दिली. तसेच कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत बबन तुकाराम बाबर यांनी घेतलेल्या ट्रॅक्टरची पाहणी केली.
यावेळी शुक्राचार्य भोसले यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डाळींबाचे उत्पादन, काढणी, ग्रेडिंग, पॅकिंग व साठवण क्षमता कशी वाढवता येते याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच डाळींब काढणीनंतर होणारे नुकसान कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब, अन्नसुरक्षा मानके, निर्यातयोग्य उत्पादन तयार करण्याचे तंत्र, तसेच शासनाच्या विविध योजना याविषयी शेतकर्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी पंढरपूरचे बाळासाहेब लांडगे ,सांगोला तालुका कृषी अधिकारी श्रीमती दिपाली जाधव, मंडळ कृषी अधिकारी, जुनोनी अमोल अभंग, उपकृषी अधिकारी, जुणोनी-1 सतीश देठे, सहाय्यक कृषी अधिकारी, चोपडी समाधान गवळी , कृषी मित्र बाळासाहेब बाबर तसेच चोपडी गावातील प्रगतशील शेतकरी सतीश पाटील, विनायक बाबर, पोपट बाबर, सुरेश मलमे उपस्थित होते.
