फासावर लटकवले तरी पुतळ्याला हात लाऊ देणार नाही
सांगोला /प्रतिनिधी ः
चिणके (ता. सांगोला) येथे स्थानिक वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य चौकात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळा हटविण्याचे आदेश प्रशासनाने दिल्यानंतर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे ऐन निवडणुकीच्या काळात गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवार दि 15 नोव्हेंबर रोजी चिनके येथे हजारो समाज बांधवांनी उपस्थित राहून फासावर चढवले तरी, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लाऊ देणार नाही असा इशारा दिल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.
चिणकेच्या मुख्य चौकात असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याबाबत झालेल्या स्थानिक तक्रारींची दखल घेत प्रशासनाने पुतळा काढण्याचे निर्देश दिले. मात्र या आदेशाला ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शविला असून आमच्यावर गुन्हे दाखल करा झाले किंवा कोणतीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका गावकर्यांनी घेतली आहे.
पुतळा संरक्षणासाठी गावातील पुरुष, महिला, शालेय विद्यार्थी, लहान मुले, युवक-युवती सर्वजण एकत्रित येत पुतळ्यासमोर दिवसभर ठिय्या आंदोलन करत आहेत. ट्रॅक्टर, जेसीबी, चारचाकी वाहनं रस्त्याच्या कडेला उभी करून नागरिकांनी आपले दैनंदिन कामकाज थांबवले आहे. आंदोलनाला मराठा समाजासह इतर समाजांकडूनही मोठा पाठिंबा मिळत असून परिसरातील अनेक गावांतील नागरिक आंदोलनस्थळी भेट देत समर्थन दर्शवीत आहेत.
तणाव वाढू नये म्हणून पोलिस प्रशासनाने गावात चोख बंदोबस्त तैनात केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुतळा हटविण्याच्या आदेशामुळे निर्माण झालेली परिस्थिती अधिक गंभीर बनू नये, यासाठी प्रशासनाने समन्वय साधून वाद मिटविण्याची गरज असल्याचे स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे. चिणके गावातील शिवरायांच्या पुतळ्यावरून उसळलेला हा वाद सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
