Breaking

Monday, 27 October 2025

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मोबदल्यातील त्रुटी तात्काळ दुरुस्त करून योग्य मोबदला मिळावा माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची पालकमंत्री ना. जयकुमारजी गोरे यांच्याकडे आग्रही मागणी




सांगोला ; प्रतिनिधी

चालू वर्षी झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदील झाला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे आणि नुकसान भरपाईत असणाऱ्या त्रुटी टाळून तात्काळ मदतीपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

सांगोला तालुक्यात प्रत्यक्षात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यांना मिळालेली नुकसान भरपाई यामध्ये गंभीर तफावत आहे. अनेक ठिकाणी मोठे शेतीचे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना अत्यल्प अनुदान मिळाले आहे तर, लहान शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्रापेक्षा अधिकचे अनुदान मिळाल्याने अनुदान वाटपात गंभीर त्रुटी असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शेतातील उभी पिके गमावून ऐन सणासुदीच्या काळात मदत मिळाली नसल्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. म्हणून, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या गंभीर प्रकरणात लक्ष घालून सोलापूर जिल्ह्यातील आणि प्रामुख्याने सांगोला तालुक्यातील अनुदान वितरणाची सखोल चौकशी करावी त्याचबरोबर ज्यांना प्रत्यक्षात नुकसान होऊनही भरपाई मिळाली नाही त्यांना त्वरित अनुदान वितरण करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत आणि नुकसान भरपाई पासून वंचित असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांचा विश्वास पुन्हा संपादित करण्यासाठी ठोस आणि तातडीने कार्यवाही करून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा व
 1. सांगोला तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील अनुदान वितरणाची तात्काळ सखोल तपासणी करण्यात यावी.
2. ज्यांना योग्य अनुदान मिळाले नाही, त्यांना प्रत्यक्ष शेतीक्षेत्र व नुकसानानुसार त्वरित सुधारित अनुदान वितरित करण्यात यावे.

3. संबंधित विभागांना स्पष्ट व ठोस निर्देश देऊन शेतकऱ्यांचा विश्वास परत मिळवण्यासाठी तातडीची कार्यवाही करण्यात यावी.
4.काही शेतकर्‍यांचे नुकसान होऊन ही या अनुदानापासून पूर्णपणे वंचित राहिले आहेत. त्यांची चौकशी होऊन त्यांना ही अनुदान मिळावे.

अशी आग्रही मागणीही या लेखी पत्राद्वारे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे,जिल्हाधिकारी सोलापूर व तहसीलदार सांगोला यांच्याकडे केली आहे.