Breaking

Friday, 17 October 2025

विधीज्ञ संघ सांगोला यांच्या विद्यमाने सर्वोच्च न्यायालय दिल्लीचे मुख्य न्यायमूर्ती बी .आर. गवई यांच्या तैल चित्राचे सांगोला विधीज्ञ संघात अनावरण

 

सांगोला /प्रतिनिधी: 



सर्वोच्च न्यायालय दिल्लीचे मुख्य न्यायमूर्ती नामदार बी. आर. गवई यांच्या तैलचित्राचे विधीज्ञ संघ सांगोला येथे शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी सांगोला न्यायालयातील प्रमुख दिवाणी न्यायाधीश पी. आर .कुलकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश ए.ए. पाटील मॅडम, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश एस.एस. साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे हे होते. 

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष नामदार मिलिंद थोबडे, विधिज्ञ संघ सांगोलाचे माजी अध्यक्ष ड.पृथ्वीराज भीमराव चव्हाण तसेच विविज्ञ संघ सांगोलाचे विद्यमान अध्यक्ष मारुती ढाळे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ड. एस. पी .कुलकर्णी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ड. जी. एल. भाकरे यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे म्हणाले, भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सहा जिल्ह्यासाठी कोल्हापूर येथे खंडपीठ उभे करण्याचा निर्णय घेतला. तरुण वकिलांनी व स्थानिक वकिलांनी आपल्या भागातील नागरिकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. त्यांच्या अडचणी काय आहेत हे आपण समजावून घेतल्या पाहिजेत. सांगोला व सोलापूर येथील वकिलांनी सक्षमपणे काम करून आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी केला पाहिजे. 

यावेळी विधिज्ञ संघाचे माजी अध्यक्ष ड. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, वकील पदवी कशी मिळवली यापेक्षा काम किती व कसे केले याला महत्त्व आहे. लोकशाहीला खर्‍या अर्थाने न्याय दिला पाहिजे. लोकांची सेवा कशी होईल हे आपण पाहिले पाहिजे. संविधान प्रत्येकाने अभ्यासले पाहिजे. संविधान वाचन सक्तीचे केले पाहिजे. भारतीय लोकशाही जगात श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ड. मारुती ढाळे म्हणाले, देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कोल्हापूर येथे सहा जिल्ह्यांसाठी खंडपीठ स्थापन करण्यासाठी मान्यता दिली. विधीज्ञ संघामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांचे तैलचित्र लावण्यात आले. हा खरा आनंदायी क्षण आहे. बार असोसिएशनचे अध्यक्ष मारुती ढाळे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला सर्व विधीज्ञ संघाने सहमती दिली. सर न्यायाधीश भूषण गवई यांचा फोटो विधीज्ञ संघात लावण्याचा हा पहिला कार्यक्रम आहे.

या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विधीज्ञ, मान्यवर तसेच माजी नगरसेवक व डिजिटल मीडियाचे राज्य उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विधीज्ञ संघाचे उपाध्यक्ष ड. समाधान दिवसे यांनी केले.