सांगोला / प्रतिनिधी -
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील सोनंद गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे कार्यरत असलेले सोनंद मंडळ अधिकारी उल्हास पोलके यांनी शेतकर्याला त्रास देत आर्थिक खंडणीची मागणी केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या दबावामुळे त्रस्त झालेल्या लल्लन पवार या शेतकर्याने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून सध्या ते दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगोला येथे उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेचे सविस्तर वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी लल्लन पवार यांच्या शेतात जेसीबी मशीनद्वारे काम सुरू होते. यावेळी मंडल अधिकारी उल्हास पोलके यांनी या ठिकाणी जाऊन वाळू उपसा चालू आहे असा आरोप करत कारवाई करण्याची धमकी दिली. त्यांनी कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली असल्याचे सांगितले जाते.
लल्लन पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ही मागणी नाकारल्याने पोलके यांनी त्यांच्यावर उलट गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर घरातील महिलांशीही त्यांनी असभ्य आणि दबाव आणणारे वर्तन केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या सततच्या मानसिक छळामुळे आणि अधिकार्यांच्या धमकीमुळे त्रस्त होऊन लल्लन पवार यांनी आपल्या जीवावरच बेतण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली. सोनंद ग्रामस्थांनी एकत्र येऊन मंडल अधिकारी उल्हास पोलके यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, पोलके यांच्यावर खंडणी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा तत्काळ दाखल करण्यात यावा आणि त्यांना तात्काळ निलंबित करून निष्पक्ष चौकशी केली जावी.
गावकर्यांनी सांगितले की, असे अधिकारी प्रशासनाला कलंक आहेत. एका प्रामाणिक शेतकर्याला खोट्या प्रकरणात गुंतवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणे हा गंभीर प्रकार आहे. याला सरकारने गांभीर्याने घेतले पाहिजे.
या प्रकरणी सांगोला तहसील कार्यालय आणि वरिष्ठ अधिकार्यांकडेही तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांचा आग्रह आहे की, आरोपी अधिकार्याला तातडीने निलंबित करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा.
या घटनेमुळे सोनंद परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनातील भ्रष्टाचार आणि अधिकार्यांच्या मनमानीविरुद्ध गावकर्यांनी ठाम भूमिका घेतली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
