Breaking

Thursday, 9 October 2025

उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांच्यासह सांगोला तालुक्यातील विविध पक्षातील नेते व कार्यकर्त्यांचा आज भाजपमध्ये होणार जाहीर प्रवेश

 


भाजपाच्या विविध मान्यवरांच्या उपस्थिती होणार जाहीर प्रवेश 

सांगोला /प्रतिनिधी: 



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर व राज्यातील महायुती सरकारच्या कार्यावर व विकास कामावर प्रभावित होऊन सांगोला तालुक्यातील शेकापसह इतर पक्षातील बड्या नेत्यांचा पदाधिकार्‍यांचा व कार्यकर्त्यांचा शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता  छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला येथे भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. तालुक्यातील या मंडळींनी एकत्रितपणे येऊन हा भाजपमधील पक्ष प्रवेशाचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे .या पक्षप्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, आदींच्या उपस्थितीमध्ये  मान्यवरांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे .राज्यातील प्रमुख मंत्री महोदय या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी सांगोल्यात येणार आहेत. 

भाजप सरकारने सांगोला तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या योजना प्रामुख्याने मार्गी लावल्या तसेच सांगोला तालुक्याच्या विकासासाठी भरीव असा निधी दिला व विकास कामे मार्गी लावली. शेकापचे ज्येष्ठनेते उद्योगपती बाळासाहेब एरंडे, पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब काटकर, माजी जि. प. सदस्य ड. सचिन देशमुख, उल्हास धायगुडे, गौडवाडीचे सरपंच पोपट गडदे, माजी नगरसेवक बाळासाहेब झपके, प्रशांत वलेकर यांच्यासह आदी मान्यवर, नंदकुमार दिघे,पदाधिकारी, कार्यकर्ते, भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. असे सोलापूर जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

यावेळी बिरुदेव शिंगाडे म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर धनगर समाजाचे दैवत आहेत. ते आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी माजी जि. प .सदस्य सचिन देशमुख म्हणाले, उद्योगपती बाळासाहेब यांनी सामाजिक कार्य करीत नावलौकिक मिळवला असून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजप पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला. शेतकरी कामगार पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यास अनेक कारणे आहेत. आमचा कोणाला विरोध नाही. सांगोला तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यावर व सर्वसामान्यांच्या प्रश्‍नावर आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत आहोत. भाजप सरकारने सांगोला तालुक्यात अनेक प्रकारची विकासकामे मार्गी लावली आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचाही वरिष्ठ पातळीवर मोठा जनसंपर्क असल्याने त्याचा फायदा तालुक्याच्या विकासासाठी होणार आहे.

या पत्रकार परिषदेत उल्हास धायगुडे म्हणाले, आमचे मार्गदर्शक किंग मेकर उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांनी तालुक्यातील जनतेच्या व युवकांच्या अडी अडचणी सोडवल्या. त्यामुळे त्यांच्या पाठीशी मोठ्या संख्येने जनसमुदाय असून भाजप प्रवेशासाठी आम्ही मोठ्या संख्येने तयार आहे.


  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री जयकुमार गोरे, जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता शेकापचे मातब्बर नेते, पदाधिकारी ,मान्यवर कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत .त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला मोठे खिंडार पडणार आहे. शेकापसह इतर पक्षातील मान्यवर ही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षात मोठी पोकळी निर्माण होणार आहे.


यावेळी उद्योगपती बाळासाहेब एरंडे म्हणाले, माझ्यासोबत वीस ते पंचवीस वर्षे मिळून एकत्रितपणे काम केलेले शेकापचे पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते आम्ही सर्वजण एकत्रितपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.  मंत्री महोदयांच्या व मान्यवरांच्या उपस्थित हा भाजप पक्ष प्रवेश शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी निश्‍चित झाला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे तालुक्यातील कोणते पदाधिकारी, नेते मंडळी पक्षप्रवेश करणार व किती कार्यकर्ते पक्ष प्रवेश करणार हे 10 तारखेला प्रत्यक्षात दिसून येईल.