सांगोला तालुक्यात मसणजोगी परिवारांसोबत बहुजन नेत्यांनी साजरी केली दिवाळी.
सांगोला प्रतिनिधी -
बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे म्हणाले, समाजाने अंधश्रद्धा, रूढी आणि परंपरांच्या बंधनातून बाहेर येऊन विज्ञानवादी विचार स्विकारला पाहिजे. मृत्यूकडे वेगळ्या नजरेने पाहू नये, जीवन हे कष्टासाठी तर मृत्यू हा विश्रांतीसाठी आहे, असे त्यांनी नमूद केले.सांगोला तालुक्यातील मसणजोगी समाजातील कुटुंबांसोबत बहुजन नेत्यांनी दिवाळी साजरी करून समाजात मानवतेचा संदेश दिला. गेली सात-आठ वर्षे सांगोला परिसरात राहत असलेले लक्ष्मणराव गणसरवाड आणि त्यांचा परिवार समाजसेवेसाठी नेहमी तत्पर असतो. कोणत्याही वेळी अडचण आली तर लक्ष्मणराव मदतीसाठी धावून येतात, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.या उपक्रमामध्ये बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे, संभाजी ब्रिगेडचे उपजिल्हाध्यक्ष अरविंद केदार, तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. दिवाळीचा आनंद गरिबांसोबत वाटून घेण्यासाठी ‘अस्तित्व’ या संस्थेचे कार्यकर्ते सोलापूर जिल्ह्यातील कानाकोपर्यात पोहोचले. शहाजी दादा आणि त्यांच्या टीमने प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन दिवाळीचा दिवा प्रज्वलित केला.मुंबईहून आलेल्या जिजाऊ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सांगोला आणि सोलापूर परिसरात विशेष कामगिरी केली. हा उपक्रम फक्त सण साजरा करण्यापुरता नसून समाजात परिवर्तनवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचा संदेश देणारा होता.
मसणजोगी परिवारांनी नेत्यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि या उपक्रमामुळे त्यांच्या चेहर्यावर आनंद फुलला. मानवतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा दीप उजळवत सांगोल्यात या वर्षीची दिवाळी खर्या अर्थाने प्रकाशमान झाली.
या उपक्रमामध्ये बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे, संभाजी ब्रिगेडचे उपजिल्हाध्यक्ष अरविंद केदार, शहाजी गडहिरे, दीपक बनसोडे, बापूसाहेब भाकरे, समाधान जावीर, चंचल बनसोडे, अतुल ठोकळे ,हाके साहेब, लक्ष्मण गणसरवाड, जया गणसरवाड तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
