सांगोला प्रतिनिधी:
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला महाविद्यालयात एकविसावा युवा महोत्सव उत्साहात आयोजित करण्यात आला. या महोत्सवात विविध कलाप्रकारांबरोबरच लोककला मंचावरील मूक अभिनय स्पर्धेने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
या मूक अभिनय स्पर्धेत एकूण 52 संघांनी सहभाग नोंदवून आपल्या सादरीकरणातून समाजमनाला भिडणार्या, विचार करायला लावणार्या आणि भावनिक स्पर्श करणार्या गोष्टींवर प्रकाश टाकला. संवादाशिवाय केवळ अभिनयाच्या जोरावर सादर केलेल्या या कलाकृतींनी प्रेक्षकांना थक्क केले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विषयांमध्ये पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण, सामाजिक भान, व्यसनमुक्ती, बालहक्क आणि मानवी मूल्ये अशा विविध सामाजिक मुद्द्यांचा प्रभावी वेध घेण्यात आला. प्रत्येक सादरीकरणात सृजनशीलता, अभिनय कौशल्य आणि सामाजिक जाण यांचा सुंदर संगम दिसून आला.
मूक अभिनय स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या अप्रतिम कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकली असून, सांगोला महाविद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या युवा महोत्सवातून विद्यार्थ्यांना आपल्या कला आणि विचार मांडण्याचे उत्कृष्ट व्यासपीठ लाभले आहे.

