महात्मा गांधीजी विचारमंच आणि संवाद प्रकाशन या संस्थेच्या वतीने महात्मा गांधीजी राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न
सांगोला/ प्रतिनिधी :
सांगोला तालुक्यातील अकोला (वासुद) या गावच्या मातीतून घडलेले शैक्षणिक, सामाजिक, सहकार आणि साहित्यिक क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे आदर्श व्यक्तिमत्त्व प्रा. नानासाहेब जगन्नाथराव लिगाडे यांना महात्मा गांधीजी राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूरचे ज्येष्ठ समाजवादी नेते भरत लाटकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
महात्मा गांधीजी विचारमंच आणि संवाद प्रकाशन या नामवंत संस्थेच्या वतीने महात्मा गांधीजी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार हा मानाचा समाजाला पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार दि. 2 ऑक्टोबर 2025 रोजी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कार गौरवामुळे सांगोला तालुक्यात त्यांच्याबद्दल अभिमान व्यक्त होत आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर, दिग्दर्शक आणि प्रकाशन अनिल म्हमाने हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते .ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते निमंत्रक प्राध्यापक टी के सरगर, भरत रसाळे, प्रा. श्रीकृष्ण अडसूळ यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी महात्मा गांधीजी यांच्या जीवन कार्यावर व विचारावर आपले मनोगत व्यक्त केले.
प्रा. नानासाहेब लिगाडे यांनी रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून हजारो विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाला दिशा दिली. तसेच शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्यादित, सांगोला येथे चेअरमन म्हणून सलग 16 वर्षे कार्य करताना त्यांनी सहकार क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले. गांधी विचारांचे ते ज्येष्ठ अभ्यासक असून 2006 ते 2016 या कालावधीत त्यांनी ‘गांधी फोरम’, नवी दिल्ली या संघटनेचे सांगोला तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
लेखन क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे आहे. झेपावणारा ग्रामीण महाराष्ट्र, माझा जीवन प्रवास आणि आठवणीतील भाई गणपतराव देशमुख ही त्यांची पुस्तके वाचकप्रिय ठरली आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कारांनी पूर्वीही झाला असून आता राष्ट्रीय स्तरावरील या पुरस्कारामुळे त्यांचा नावलौकिक अधिक वृद्धिंगत झाला आहे.प्रा. नानासाहेब लिगाडे यांचा हा सन्मान सांगोला तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला असून विविध क्षेत्रांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.

