सांगोला प्रतिनिधी
केंद्रीय अथवा राज्य सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी असोत आपण आपल्या आयुष्यातील तीस ते चाळीस वर्षे अत्यंत तळमळीने व मनापासून सेवा करत कृतार्थ भावनेने सेवानिवृत्त झालात. आपल्या सेवाकालामध्ये स्वतःला झोकुन देत उत्कृष्ट कामगिरी केली. आपण बजावलेल्या चोख सेवेची पोचपावती म्हणून आपला सन्मान व्हावा. कार्यावरील निष्ठेचा गुणगौरव व्हावा. या उदात्त भावनेने सूर्योदय ग्रुपच्या वतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. एलकेपी मल्टीस्टेट, सूर्योदय अर्बन अथवा सूर्योदय मॉल अशा सूर्योदय ग्रुपच्या प्रत्येक व्यवसायावर आपणा सर्वांच्या आशीर्वादाची छत्रछाया असून आपल्यासारख्या थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादावरच सूर्योदय ग्रुपची गगनभरारी सुरू असल्याचे भावनिक उद्गार सूर्योदय परिवाराचे कुटुंबप्रमुख आणि एल के पी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी व्यक्त केले. सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील केंद्र सरकार आणि राज्य सरकारी सेवेतून अनेकविध खात्यामधून सेवानिवृत्त झालेल्या तसेच विविध खात्यामध्ये नुकतेच प्रमोशन झालेल्या कर्मचारी वृंदांचा सन्मान सोहळा सूर्योदय बँक्वेट हॉल सांगोला येथे आयोजित करण्यात आलेला होता. याप्रसंगी ते बोलत होते. यानिमित्ताने आपणा सर्वांचे सूर्योदय परिवारा सोबत एक भावनिक अतुट नाते निर्माण झाले असून आपणास पुढील आयुष्यात कठीण प्रसंगी म्हणजे अगदी रक्ताच्या बॉटलची जरी गरज भासली तरी देखील आम्ही आपल्या हाकेस धावून येऊ. असेही अनिलभाऊ इंगवले यांनी याप्रसंगी सांगितले. सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, महाविद्यालयीन प्राध्यापक, सैन्य दलातील जवान, महसूल खाते, पोलीस दल, नगरपालिका, एम एस सी बी, आरोग्य विभाग अशा सर्व खात्यांमधील गेली वर्षभरामध्ये सेवानिवृत्त झालेल्या सुमारे पावणे दोनशे अधिकारी व कर्मचारी बांधवांचा यामध्ये समावेश होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राधानगरी, कोल्हापूर येथील विनोदी वक्ते प्रा संभाजी यादव यांनी सुमारे दीड तास आपल्या अमोघ वाणी मधून चिंतनीय मार्गदर्शन करत अनेक वैशिष्ट्यपूर्ण आवाज हुबेहूब काढत आणि कितीतरी विनोदी प्रसंग सांगत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी क्रीडा शिक्षक शहाजी घाडगे सर, मुख्याध्यापिका सौ संगीता गायकवाड मॅडम, केंद्रप्रमुख हमजू मुलानी तसेच सूर्योदय उद्योग समूहाचे सहसंस्थापक जगन्नाथ भगत गुरुजी इत्यादी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी मंचावर सूर्योदय दूध विभागाचे चेअरमन डॉ बंडोपंत लवटे, एल के पी मल्टीस्टेटचे व्हा चेअरमन सुभाष दिघे गुरुजी, सूर्योदय महिला अर्बनच्या चेअरमन सौ अर्चनाताई इंगवले, व्हा चेअरमन सौ ज्योतीताई भगत, सूर्योदय परिवाराच्या संचालिका सौ मीनाक्षीताई दिघे, सौ सुरेखाताई लवटे तसेच सूर्योदय परिवाराचे संचालक प्रशांत पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक सत्कारमूर्तींना मानाचा फेटा, मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सहकुटुंब गौरवण्यात आले. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. सर्व सत्कारमूर्तींना दिलेले आग्रहाचे निमंत्रण, प्रत्येकाची आस्थेने केलेली विचारपूस, शाही सन्मान आणि वैचारिक मेजवानी यामुळे सूर्योदय समूहाने केलेला सन्मान कायम स्मरणात राहील अशा भावना यावेळी अनेकांनी बोलून दाखवल्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्योदय अर्बन, सूर्योदय फाउंडेशन, सूर्योदय महिला अर्बन आणि एल के पी मल्टीस्टेटच्या कर्मचारी वृंदांनी अथक परिश्रम घेतले.
