Breaking

Tuesday, 16 June 2026

बँजो कॉम्पिटिशन बंद होणार*

 



असोसिएशनचा ऐतिहासिक निर्णय*


महाराष्ट्र राज्य बँजो, बँड असोसिएशन यांच्या वतीने कराड येथे आयोजित बँजो, बँड मालकांच्या राज्यस्तरीय बैठकीत आगामी गणेशोत्सवात बँजो कॉम्पिटिशनवर बंदी घालण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातील बँजो, बँड मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


गणेशोत्सव मिरवणुकीत बँजोंची संख्या मोठ्या प्रमाणात असते. गणेशोत्सव मंडळांच्या वर्चस्वासाठी बँजो ग्रुपमध्ये आवाजाचे कॉम्पिटिशन लावले जाते. बँजो कॉम्पिटिशनमध्ये मोठ्या प्रमाणात आवाज सोडला जातो. प्रेशर हॉर्न वाजवले जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. साऊंडचे नुकसान होते. दोन मंडळांमध्ये वाद होतात. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. बँजो, बँड मालक आणि संबंधित मंडळाला पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी सर्व मालकांनी एकत्रितपणे हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. साऊंडवर हॉर्न न वाजवणे तसेच आवाजाचे कॉम्पिटिशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


मिरवणुकीत जर दोन पेक्षा अधिक बँजो ग्रुप समोरासमोर आले तर बॅन्जो मालकाने जबाबदारीने पुढाकार घेऊन स्वतःचा साउंड बंद करून समोरच्या बँजो ग्रुपचा साउंड बंद करण्याबाबत पुढाकार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. एकाच ठिकाणी समोरासमोर आलेल्या बँजो ग्रुपनी प्रत्येकी दोन किंवा तीन गाणे वाजवून पुढे जावे, एका वेळेस एकाच बँजोचे सादरीकरण होण्यासाठी सर्व बँजो मालकांनी पुढाकार घ्यावा असे ठरले. कॉम्पिटिशन बंदच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र राज्य बँजो, बँड असोसिएशनने नियमाचे उल्लंघन करणार्‍या बँजो मालकास 50 हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय सतत नियम मोडणार्‍या बॅन्जो मालकांवर या आर्थिक दंडाशिवाय महाराष्ट्र राज्य बँजो, बँड असोसिएशनकडून सामूहिकपणे पोलिसात तक्रार देण्याचाही निर्णय बहुमताने घेण्यात आला. 


या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्याचेही ठरले. यावेळी कोअर कमिटी गठीत करण्यात आली. महाराष्ट्र राज्य बॅन्जो व बॅन्ड असोसिएशनने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल गणपती मंडळांसह राज्यभरातील बँजोप्रेमींकडून समाधान व्यक्त होत आहे.