Breaking

Tuesday, 26 May 2026

फॅबटेकच्या शिक्षिका शितल घोंगडे यांना पीएचडी प्रदान

 

सांगोला : प्रतिनिधी



फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सांगोला येथे कार्यरत असलेल्या मराठी विषयाच्या शिक्षिका शितल अविनाश घोंगडे यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य सिकंदर पाटील यांनी दिली.

राजस्थान येथील श्री जगदीश प्रसाद झाबरमल टेबडीवाला विद्यापीठामध्ये त्यांनी स्त्री जीवनाच्या विविध पैलूंचे चित्रण या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता. या संशोधन कार्यासाठी डॉ. प्रतिभा घाग यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

शितल घोंगडे या सन 2017 पासून फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सांगोला येथे मराठी विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत असून विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे. शैक्षणिक कार्यासोबतच त्यांना कविता व लेखनाची विशेष आवड असून विविध संस्थांकडून त्यांना कविता लेखनासाठी अनेक पुरस्कार व पारितोषिकांनी गौरविण्यात आले आहे.

त्या अष्टपैलू संस्कृती कला अकॅडमी, मुंबई या संस्थेच्या साहित्यिक कार्यकारिणी समिती 2026 च्या सदस्या आहेत. तसेच संस्थेमार्फत वर्षभर आयोजित करण्यात येणार्‍या विविध स्पर्धांमध्ये इयत्ता तिसरी व चौथीच्या गटासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धांचे परीक्षक म्हणूनही त्या कार्य पाहत आहेत.

शैक्षणिक क्षेत्राबरोबरच साहित्यिक, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय समाजाभिमुख कार्य सुरू आहे. त्यांच्या पीएचडी प्राप्तीबद्दल फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, प्राचार्य सिकंदर पाटील तसेच फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.