Breaking

Monday, 6 April 2026

तमाशा कलावंतांवर हल्ला; सांगोल्यातून संताप, अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाईची मागणी

 

सांगोला / प्रतिनिधी -



राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील कलावंतांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करत सांगोला शहर व तालुक्यातील कलावंत आणि बहुजन समाजाच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदन सादर करण्यात आले. या प्रकरणातील आरोपींवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावर तमाशा फडाच्या वाहनाला दुचाकीस्वारांनी कट मारल्याने वाद निर्माण झाला. यानंतर संबंधितांनी 50 ते 60 जणांना एकत्र करून कलावंतांवर हल्ला केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेत कलाकारांना मारहाण करण्यात आली असून महिला कलाकारांनाही शिवीगाळ करून बेइज्जत करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हा हल्ला जातीय द्वेषातून झाल्याचा आरोप करत महाराष्ट्राच्या लोककलेचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. तमाशा ही राज्याची पारंपरिक कला असून अशा प्रकारच्या घटनांमुळे कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, हे निवेदन तहसीलदार बाळुताई भागवत यांना देण्यात आले. निवेदन देताना बापूसाहेब ठोकळे, शाहीर सुभाष गोरे, लकी कांबळे, शिवाजी इंगोले, दीपक ऐवळे यांच्यासह अनेक कलावंत व नागरिक उपस्थित होते.

या घटनेमुळे सांगोला तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाने तातडीने कारवाई करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी जोर धरत आहे.