Breaking

Tuesday, 10 March 2026

सांगोला नगरपरिषदेचा महिला दिन उत्साहात; ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

सांगोला / प्रतिनिधी :





सांगोला नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 7 व 9 मार्च रोजी विविध स्पर्धा आणि ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला असून विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

7 मार्च रोजी पाककला व ग्रुप डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पाककला स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाकरिता 5 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 3 हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 2 हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत अफरीन पठाण, मनीषा हुंडेकरी, नीता लाटणे आणि राजाबाई मस्के यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले.

तसेच ग्रुप डान्स स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाकरिता 7 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 5 हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 3 हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत युवा ग्रुप, सखी ग्रुप, धुरंदर ग्रुप आणि चौंडेश्‍वरी ग्रुप यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला.

9 मार्च रोजी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन येथे सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. छायाताई मेटकरी, डॉ. सौ. निकिताताई बाबासाहेब देशमुख, सौ. अपेक्षाताई पाटील, पंचायत समिती सदस्या सौ. राणीताई पाटील, सौ. वंदना शेळके, स्त्रीरोग तज्ञ डॉ. सौ. नेहा साळुंखे-पाटील, डॉ. सौ. मेघना देवकाते, तालुका कृषी अधिकारी सौ. दिपाली जाधव, कर्तव्यदक्ष शहर संघाच्या अध्यक्षा सौ. सुनंदाताई घोंगडे तसेच माजी नगरसेविका पूजाताई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका राणीताई माने यांनी कार्यक्रमांची रूपरेषा मांडली. यावेळी डॉ. निकिताताई देशमुख यांनी महिलांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे सांगितले. अपेक्षाताई पाटील यांनी प्रत्येक महिलांनी स्वतःसाठी वेळ देत जीवन आनंदाने जगावे, असा संदेश दिला. तर स्त्रीरोग तज्ञ डॉ. नेहा साळुंखे-पाटील यांनी महिलांनी स्वतःच्या आरोग्य व विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमात साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कवयित्री पुष्पाताई मिसाळ, मनीषा ठोंबरे, अर्चना देसाई, सुवर्णा तेली आणि हर्षदा गुळमिरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच प्रशासनातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सायली पाटील यांचाही सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत विविध खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पाककला स्पर्धेचे परीक्षक तनुजा गवळी, छाया यादव आणि राजश्री महिमकर तसेच डान्स स्पर्धेचे परीक्षक मृणाल राऊत, शुभांगी पतंगे व सावित्रा कस्तुरे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनुपमाताई गुळमिरे यांनी केले. तसेच नगरपरिषदेच्या कर अधिकारी प्रियांका पाटील, अस्मिता निकम व इतर कर्मचार्‍यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत नेहा कावळे, पूजा बागडे आणि ज्योती गोडसे या पैठणीच्या मानकरी ठरल्या. बक्षीस वितरण समारंभाने कार्यक्रमाची सांगता झाली.