लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ताजी असतानाही ‘मलिद्या’शिवाय काम होत नसल्याची चर्चा; नागरिक संतप्त, प्रशासन कारवाई करणार का?
भाग - 5
सांगोला / प्रतिनिधी :
सांगोला तालुक्यात अलीकडेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या धडक कारवाईमुळे भ्रष्टाचाराविरोधात प्रशासन कठोर पावले उचलत असल्याचा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला होता. मात्र ही कारवाई ताजी असतानाच सांगोला येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कारभाराबाबत पुन्हा एकदा गंभीर तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. या कार्यालयात काही कामे ‘मलिद्या’शिवाय होत नाहीत, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली असून त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे.
सांगोला तालुक्यातील नागरिकांसाठी दुय्यम निबंधक कार्यालय अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जमीन खरेदी-विक्रीची कागदपत्रे नोंदणी करणे, दस्तऐवजांची तपासणी, उतारे देणे, मालमत्तेशी संबंधित व्यवहार नोंदवणे यांसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक या कार्यालयात येत असतात. मात्र या कार्यालयातील कामकाज अत्यंत संथ गतीने होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे तसेच लहानसहान कामांसाठीही वारंवार कार्यालयाच्या फेर्या माराव्या लागत असल्याचे सांगितले जात आहे.
काही नागरिकांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, काही प्रकरणांमध्ये कागदपत्रे मुद्दाम प्रलंबित ठेवली जातात. त्यानंतर संबंधितांकडून ‘मलिदा’ दिल्यासच कामे वेगाने पूर्ण केली जातात, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे या कार्यालयातील कारभाराबाबत शंका निर्माण होत असून सरकारी यंत्रणेवरील विश्वास डळमळीत होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, तालुक्यात नुकतीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र त्या कारवाईनंतरही दुय्यम निबंधक कार्यालयाबाबत अशा तक्रारी समोर येत असल्याने हम करे सो कायदा अशा पद्धतीने काहीजण कारभार करत आहेत का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर आता नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगू लागली आहे की, या कार्यालयातील काही अधिकार्यांना नेमके कोणाचे अभय आहे? तसेच वारंवार तक्रारी असूनही संबंधितांवर कारवाई का होत नाही? वरिष्ठ अधिकार्यांनी या प्रकरणाची चौकशी करून सत्य समोर आणणार का? दोषींवर कठोर कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
याशिवाय, या कार्यालयात अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नसल्याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सरकारी कार्यालयात पारदर्शकता राखण्यासाठी आणि नागरिकांशी होणार्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत आवश्यक मानले जातात. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा का बसवण्यात आली नाही, याबाबतही नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेल्यास कार्यालयातील कामकाज अधिक पारदर्शक होईल आणि कोणत्याही गैरप्रकाराला आळा बसेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
सांगोला तालुक्यातील नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये वेळेत, पारदर्शक आणि त्रासमुक्त सेवा मिळावी हीच अपेक्षा आहे. मात्र दुय्यम निबंधक कार्यालयातील कथित ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचा संयम सुटू लागल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी, संबंधित जबाबदारांवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी आता नागरिकांमधून होत आहे.
