Breaking

Wednesday, 4 March 2026

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळास 3 लाखांची देणगी; दात्यांचा ओघ सुरूच

 

सांगोला( प्रतिनिधी )




सांगोला येथील अग्रगण्य शैक्षणिक संस्था ’सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेने आपल्या गौरवशाली वाटचालीच्या 75 व्या वर्षात म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून समाजातील विविध स्तरांतून संस्थेच्या शैक्षणिक कार्याला बळ देण्यासाठी मदतीचा ओघ सुरू झाला असून, नुकताच एकूण 3 लाख 4 हजार 511 रुपयांचा देणगी निधी संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

संस्थेच्या या अमृत महोत्सवी प्रवासात अनेक दानशूर व्यक्तींनी आपल्या प्रियजनांच्या स्मृती जपत सामाजिक बांधिलकी जपली आहे. यामध्ये सौ. अनुराधा खडतरे यांनी आपले वडील कै.शंकर कांबळे यांच्या स्मरणार्थ 1 लाख रुपयांची भरीव मदत देऊन आदर्श घालून दिला आहे. तसेच रत्नाकर ऊर्फ विलास ठोंबरे यांनी 75 हजार रुपयांचा निधी देऊन संस्थेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने एस.एस.सी. 1984 च्या बॅचने एकत्रित येत 91 हजार रुपयांचा निधी जमा करून आपल्या मातृसंस्थेच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला आहे.

या व्यतिरिक्त प्रा.बबन गायकवाड यांनी आपले वडील कै.सिद्राम गायकवाड यांच्या स्मरणार्थ 11 हजार रुपये, तर सौ. अनिता पोरे आणि प्रभाकर व्हटे यांनी प्रत्येकी 10 हजार रुपयांचे योगदान दिले आहे. पहिल्या बॅचचे ज्येष्ठ विद्यार्थी तुकाराम श्रावण गुळमिरे यांनी 7 हजार 511 रुपयांची देणगी देऊन शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.अशा प्रकारे एकूण 3 लाख 4 हजार 511 रुपये इतकी रक्कम संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने जमा झाली आहे. 74 वर्षांच्या प्रदीर्घ परंपरेत संस्थेने हजारो विद्यार्थी घडवले असून, समाजाकडून मिळणारा हा प्रतिसाद संस्थेच्या भविष्यातील प्रगतीला अधिक गती देणारा ठरणार आहे. या सर्व देणगीदारांचा संस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते सत्कार करण्यात आला व दातृत्वाबद्दल त्यांचे आभार मानण्यात येत आहे.