माढा येथे महापुराची कारणे व उपाय यावर एक दिवसीय चर्चासत्र संपन्न
माढा / प्रतिनिधी :
सप्टेंबर 2025 मध्ये सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात सीना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने आलेल्या महापुरात शासन, विविध सामाजिक संस्था व व्यक्तींकडून मदत झाली असली, तरी आपत्तीनंतर होणार्या दूरगामी परिणामांकडे आणि त्यावरील उपाययोजनांकडे सर्वच पातळ्यांवरून दुर्लक्ष झालेले दिसून येते.आपत्तीनंतर दीर्घकालीन परिणाम करणार्या अनेक बाबी उद्भवतात. त्यांचा गांभीर्याने विचार करून उपाययोजना करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ललित बाबर यांनी डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेच्या वतीने आयोजित महापुराची कारणे, परिणाम व उपाय या एक दिवसीय चर्चासत्रात केले.या वेळी अशोक शिंदे, वाय. जे. भोसले, रयत कॉलेज माढ्याचे प्राचार्य हराळे सर, जगदाळे फाउंडेशनचे शिवाजीराव जगदाळे, पत्रकार विजय शिंदे, लक्ष्मण देवकुळे, देविदास खरात, पत्रकार मदन चौरे, रुपेश आडकर, पत्रकार अमर गायकवाड, बाबासाहेब वडवे, नंदू मोरे, प्रभा यादव, शर्मिला केदार आदी उपस्थित होते.
सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. याचा थेट परिणाम त्यांच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर होणार आहे. भविष्यातील आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी परिसराचे भौगोलिक स्वरूप, महापुराची पार्श्वभूमी, सीना नदी क्षेत्रातील अडथळे यांचा सर्वांनी गांभीर्याने अभ्यास करणे आवश्यक आहे. स्थानिक संस्था, संघटना, प्रशासकीय विभाग व नागरिकांनी एकत्र येऊन पुराची कारणे व भविष्यातील उपाययोजना याबाबत सजग राहावे, असेही ललित बाबर यांनी सांगितले.
यावेळी अशोक शिंदे यांनी सांगितले की, सीना-कोळेगाव धरण 100 टक्के भरल्यानंतर तसेच खासापुरी व चांदणी धरणे भरल्यानंतर नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. उथळ असलेल्या सीना नदीचे पाणी एक ते दोन किलोमीटरपर्यंत पसरल्याने शेती व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या महापुरात जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून अजूनही काही लोकांना मदत मिळणे आवश्यक आहे.
प्राचार्य हराळे सर यांनी सीना नदीची ऐतिहासिक पार्श्वभूमी मांडताना सांगितले की, दख्खनच्या पठारावरील बालाघाट पर्वतरांगांमध्ये उगम पावणारी ही नदी उथळ व पसरट आहे. या परिसरातील काळी माती असल्याने कमी कालावधीत पाणी नदीपात्राबाहेर पडते. नदीकाठावरील वृक्षतोड, अतिक्रमणे तसेच अतिवृष्टी ही नैसर्गिक व मानवनिर्मित कारणे महापुरास कारणीभूत ठरत आहेत. भविष्यात अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकांनी सजग व सक्षम राहणे आवश्यक आहे.
शिवाजीराव जगदाळे यांनी सांगितले की, पूरकाळात विविध संस्था व संघटनांकडून अन्नधान्य, स्वच्छता साहित्य व इतर मदत पूरग्रस्तांना देण्यात आली. शासनाकडूनही कुटुंबांना तसेच दोन हेक्टरपर्यंतच्या पेरणीसाठी मदत मिळाली आहे. मात्र काही लोकांना अद्याप मदत मिळालेली नाही तसेच दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकर्यांसाठीही मदत मिळावी, यासाठी शासनाशी संवाद साधणे गरजेचे आहे.
वाय. जे. भोसले यांनी सांगितले की, धरणांचे योग्य व्यवस्थापन झाले नाही. पूर्ण क्षमतेने धरण भरल्यानंतरच पाणी सोडण्यात आले आणि त्याच काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा सामना करावा लागला. भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी शासन, स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था व अभ्यासकांनी एकत्र येऊन नियोजन करणे आवश्यक आहे.
पत्रकार मदन चौरे यांनी सांगितले की, या पुरात मनुष्यहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात पशुहानी व आर्थिक नुकसान झाले आहे. सीना नदीची पूरनियंत्रण रेषा अद्याप निश्चित झालेली नाही. गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समित्यांची क्षमता वाढवून त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. तसेच वृक्षतोडीमुळे होणार्या उद्भवणार्या आपत्तीचा विचार करून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करणे आवश्यक आहे.
रुपेश आडकर यांनी सांगितले की, नदीपात्राचे खोलीकरण न झाल्याने पाणी बाहेर पडले. ओढे-नाले व त्यातून येणार्या पाण्याची नोंद गाव पातळीवर ठेवणे गरजेचे आहे. नदीपात्रातील गाळ काढणे, नदी परिसरात वृक्षलागवड करणे तसेच आपत्ती काळातील व्यवस्थापनासाठी युवक गटांना सक्षम करणे आवश्यक आहे.
या चर्चासत्रात प्रभा यादव, देविदास खरात, अमर गायकवाड, लक्ष्मण देवकुळे, बाबासाहेब वडवे आदींनी आपले अनुभव कथन केले.चर्चासत्राचे प्रास्ताविक ललित बाबर यांनी केले. संस्थेच्या कामाची मांडणी शर्मिला केदार यांनी केली. सूत्रसंचालन नंदू मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन गौसपाक मुलानी यांनी केले.
या चर्चासत्रासाठी माढा, मोहोळ, परांडा व धाराशिव येथील पूरग्रस्त गावांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार विजय शिंदे व निखिल बारबोले यांनी विशेष परिश्रम घेतले.
