Breaking

Friday, 20 February 2026

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीविरोधात सोमवारी बिलेवाडीतील नागरिकांचे ‘रस्ता रोको’

 

सांगोला प्रतिनिधी :



सांगोला शहरातील बिलेवाडी येथील ‘पैलवान’ ट्रान्सफॉर्मर गेल्या पंधरा दिवसांत दोन वेळा जळाल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांकडून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप स्थानिक शेतकर्‍यांनी केला आहे. याच्या निषेधार्थ बिलेवाडी, देशमुख वस्ती आणि गायकवाड वस्ती येथील शेतकरी सोमवार, दि. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मिरज-पंढरपूर महामार्गावर ‘रस्ता रोको’ आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली.

पंधरा दिवसांपूर्वी ‘पैलवान’ ट्रान्सफॉर्मर जळाला होता. तो बदलून बसविण्यात आलेला नवीन ट्रान्सफॉर्मर सुरू करण्यापूर्वीच पुन्हा जळाल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. याबाबत संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, त्यांनी ट्रान्सफॉर्मर बसविण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही अधिकार्‍यांकडून पैशांची मागणी होत असल्याचाही शेतकर्‍यांचा दावा आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकर्‍यांनी आजी-माजी लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवले; मात्र अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. जळालेला ट्रान्सफॉर्मर काढून नेण्यासाठीही तीन दिवसांपासून टाळाटाळ केली जात असल्याचे सांगण्यात आले. अधिकार्‍यांकडून विविध कारणे सांगून ठेकेदारांचे क्रमांक देण्यात येत असून, ठेकेदारांकडून महिनाभर ट्रान्सफॉर्मर मिळणार नाही, तुम्ही वर्गणी काढून खाजगीत बसवा, अशी सूचना केल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून, शेतकर्‍यांची उभी पिके करपू लागली आहेत. शेतीसाठी व जनावरांसाठी पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून तात्काळ नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी करत बिलेवाडी, देशमुख वस्ती आणि गायकवाड वस्ती येथील शेतकरी सोमवार, दि. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मिरज-पंढरपूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.