Breaking

Saturday, 21 February 2026

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालय यांच्या सांगोला सेवा केंद्रात 90 वी त्रिमूर्ती महाशिवरात्री संपन्न

 

सांगोला प्रतिनिधी :



प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाच्या सांगोला सेवा केंद्रात 90 वी त्रिमूर्ती महाशिवरात्री संपन्न झाली. या कार्यक्रमास नगर परिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने व नगरसेवक रामचंद्र बापू मदने, तसेच नगरसेविका राणी आनंदा माने, वैशाली सतीश सावंत, गोदाबाई भारत बनसोडे, आशादेवी सोमेश्‍वर यावलकर, छाया सूर्यकांत मेटकरी, सुजाता चेतनसिंह केदार सावंत यांच्यासह इतर अनेक नागरिक उपस्थित होते.


या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने यांच्या हस्ते झाली. सर्व मान्यवरांचे शुभहस्ते दीपप्रज्वलनासह तिलक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच ईश्‍वरीय संघात स्वीकार करण्यात आला. सांगोला सेवा केंद्राच्या उपसंचालिका बी.के. इंदिरा बेहेन यांनी संस्थेचा सर्वांना परिचय करून दिला व सामाजिक पाठ्यक्रम पूर्ण करण्याचे आवाहन केले.

मुख्य संचालिका बी.के. राजयोगिनी यशोदा दीदी यांनी ‘महाशिवरात्रीचे महत्त्व’ या विषयावर आपले मत मांडले. त्यांनी सांगितले की, सध्याची वेळ ही पुरुषोत्तम संगमयुगाची असून परमपिता शिव परमात्मा सृष्टीवर अवतारित झाले असून देवी स्वराज्याची निर्मिती करीत आहेत. श्रीमद् भगवद्गीतेच्या ज्ञानानुसार कलियुग संपलेले आहे. परमपिता परमात्मा सर्व मनुष्यसृष्टीच्या उद्धारासाठी भारतभूमीवर साकार माध्यम प्रजापिता ब्रह्माच्या द्वारे माउंट आबू या सर्वोत्तम तीर्थक्षेत्री अवतरित झाले असून, नराला श्रीनारायण व नारीस श्रीलक्ष्मी, अर्थात मनुष्याला दैवी गुणसंपन्न देवी-देवता समान बनविण्यासाठी ईश्‍वरीय ज्ञान व सहज राजयोगाचे शिक्षण ‘सर्वधर्मसमभाव’ व ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वांनुसार विनामूल्य, निरंतर या विश्‍वविद्यालयाच्या देश-विदेशातील सेवा केंद्रामार्फत दिले जात आहे.

मानवी जीवन श्रेष्ठाचारी बनविण्यासाठी नैतिक मूल्ये जीवनात अवलंबण्याचा ‘स्वपरिवर्तन से विश्‍व परिवर्तन’ हा नारा अंगीकारला पाहिजे. यासाठी प्रथम स्वतःला ओळखणे आवश्यक आहे. आज बहुतांश जण स्वतःला पाच तत्त्वांनी बनलेले शरीर, धर्म-जात-पद-प्रतिष्ठा-शिक्षण यांनी बनलेले व्यक्तिमत्त्व समजत आले आहेत; पण स्वतःची खरी ओळख विसरल्याने मनुष्य दुःखी, निराश, तणावग्रस्त होऊन काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार, भय, आळस या मनोविकारांच्या आधीन झाला आहे. यापासून मुक्त होण्यासाठी शक्तीची आवश्यकता आहे. मन, वचन, कर्माने भ्रष्ट आचरणातून व व्यसनाधीनतेपासून मुक्त, स्वतंत्र बनविण्यासाठी सहज योगाचा अभ्यास अत्यंत आवश्यक आहे.

स्वतः निराकार परमपिता परमात्मा शिव, जे सर्व आत्म्यांचे हितैषी आहेत, सर्व मनुष्यात्म्यांना सृष्टीच्या आदि-अंताचा इतिहास-भूगोलाचे ज्ञान व प्राचीन राजयोगाचे प्रशिक्षण ब्रह्माकुमारीजद्वारे देत आहेत. मुलांनो, तुम्ही सर्व एक चैतन्य, अविनाशी, शुद्ध आत्मा आहात; या शरीराला चालवणारी, कर्मेंद्रियांद्वारे कर्म करणारा कर्ता आपण एक आत्मा आहोत. मन-बुद्धी-संस्कारांसहित परिवर्तन करणारी दिव्यशक्ती आत्मा आहात. शांती, प्रेम, सुख, पवित्रता, आनंदस्वरूप आपण एक आत्मा, परमात्म्याची मुले-संतान आहोत; जो ज्ञान, प्रेम, शांती, सुख, पवित्रता, आनंदाचा सागर आहे, असे त्यांनी सांगितले.

आपले मनोगत व्यक्त करताना माजी नगराध्यक्ष सौ. राणीताई माने यांनी सत्काराबद्दल आभार मानून ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाचा साप्ताहिक पाठ्यक्रम पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले. या कार्यक्रमात मान्यवरांचे बी.के. बाळूभाई राऊत यांनी स्वागत केले, तर बी.के. डोईफोडे माता यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.के. पांडुरंग कुंभार सर यांनी केले.