बाबासाहेबांनी आम्हाला संविधानाचा अधिकार दिला आणि ते संविधान घराघरात पोहोचवणे ही काळाची गरज आहे - बापूसाहेब ठोकळे.
सांगोला / प्रतिनिधी :
आज सांगोला येथे ‘घर घर संविधान ’ या अभियानांतर्गत जागर कार्यक्रम उत्साहात पार पडला. सांगोल्यातील भवानी चौक येथे संविधान बचावासाठी एक पथक दाखल झाले होते. या पथकाने नाट्यरूप सादरीकरणातून संविधानाचा कसा र्हास होत आहे आणि त्याचा कशाप्रकारे दुरुपयोग केला जात आहे, याचे प्रभावी चित्रण केले.या वेळी बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आज आपण जे काही आहोत, आपण घेतो तो श्वास आणि खातो तो घास, हे सर्व केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहे. त्यांनी संपूर्ण समाजाला समानतेचा आणि न्यायाचा आदर्श दिला. भारतीय संविधान लिहिण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. त्यांच्या या त्यागाची आणि संघर्षाची आपण जाणीव ठेवली पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, डॉ. आंबेडकरांना आयुष्यात अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले. समाजहितासाठी त्यांनी वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा त्याग केला. माझा समाज आणि माझी माणसं हीच माझी खरी ताकद आहे, ही भावना त्यांच्या कार्यामागे होती. मात्र आज काही राजकीय हेतूंनी प्रेरित लोक संविधानातील मूल्ये सर्वसामान्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने संविधान वाचवण्यासाठी आणि त्यातील तत्त्वे जपण्यासाठी सजग राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला सांगोल्यातील विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
