सांगोला/प्रतिनिधी ः
मा. दीपक आबा साळुंखे -पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिलेवाडीच्या प्राथमिक शिक्षिका सुनीता जगन्नाथ बाबर यांना देऊन सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार मा. दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या सौ. सुनीता जगन्नाथ बाबर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले योगदान, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, तसेच शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत केलेली लक्षणीय वाढ याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
सुनीता बाबर या गेल्या अनेक वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत असून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची गोडी निर्माण करणे, संस्कारक्षम शिक्षण देणे आणि पालक-शिक्षक समन्वय वाढवणे यासाठी त्या विशेष प्रयत्नशील असतात. विविध शैक्षणिक उपक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, तसेच सहशालेय उपक्रमांतही त्यांचे मोलाचे योगदान आहे.
या पुरस्काराबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. हा पुरस्कार मिळाल्याने भविष्यात अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना सौ. सुनीता बाबर यांनी व्यक्त केली.
