सांगोला/ प्रतिनिधी
पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजर्या होणार्या राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून समाजप्रबोधन, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि लोकशाही बळकट करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, कर्करोग, रक्तदोष यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे सांगून नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्यासाठी पत्रकारांनी विशेष लेखन, परिसंवाद व जनजागृती मोहिमा राबवाव्यात, असे आवाहन आ. डॉ. देशमुख यांनी केले. तसेच सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून शेतकरी व समाजामध्ये सेंद्रिय शेतीविषयी प्रबोधन करण्यामध्ये पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधताना पत्रकार भवन, गृहनिर्माण योजना तसेच सामाजिक व वैयक्तिक सुरक्षेसंबंधी विषयांसाठी संघटितपणे पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासन व लोकप्रतिनिधींशी नियमित संवाद ठेवल्यास या प्रश्नांना मार्ग निघू शकतो, असेही ते म्हणाले.
गुन्हे विषयक बातम्यांबाबत माहिती वेळेत उपलब्ध न झाल्याने पत्रकारांना येणार्या अडचणी लक्षात घेता, पोलीस प्रशासन व पत्रकार यांच्यात समन्वय बैठक घेण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यामुळे माहितीची देवाणघेवाण अधिक सुलभ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष उपस्थितीत तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांसाठी एक विशेष संवाद सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या भविष्यातील विकास व्हिजनसह पत्रकारिता क्षेत्रातील विविध मुद्दे, आव्हाने आणि भविष्यकाळावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
दिनांक : मंगळवार, 06 जानेवारी 2025
वेळ : दुपारी 2.00 वाजता
स्थळ : स्व. डॉ. गणपतरावजी देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी, सांगोला
या संवाद सत्रामुळे लोकप्रतिनिधी व पत्रकार यांच्यातील संवाद अधिक दृढ होऊन लोकशाही अधिक सक्षम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. शेवटी, निर्भीड व प्रामाणिक पत्रकारिता करणार्या सर्व पत्रकार बांधवांना आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
