सांगोला/प्रतिनिधी:
दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी सांगोला महाविद्यालयामधील अर्थशास्त्र विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अर्थवेध’ पोस्टर चे प्रकाशन करण्यात आले. ‘अर्थवेध’ पोस्टर चे प्रकाशन वसुंधरा कला महाविद्यालय, सोलापूर येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. आर. के. पाटील आणि सांगोला महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.बी.एच. कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उमा महाविद्यालय पंढरपूर येथील प्राचार्य, डॉ. धीरजकुमार बाड हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक-आर्थिक समस्यांची जाणीव निर्माण करणे, अर्थशास्त्रातील विविध नव-नवीन संकल्पना समजून घेणे, विषय मांडणीचे कौशल्य निर्माण करणे आणी संशोधनात्मक दृष्टिकोण विकसित करणे इ. उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाविद्यालयातील आर्ट्स विभागातून विविध वर्गांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भारतीय अर्थव्यवस्था, आर्थिक नियोजन, ग्रामीण विकास, वित्तीय साक्षरता, रोजगारनिर्मिती, डिजिटल अर्थव्यवस्था आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी माहितीपूर्ण व आकर्षक पोस्टर्स तयार केले होते. तसेच यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवरती स्वतः लिहिलेल्या लेखांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व अभ्यासपूर्ण मांडणीचे कौतुक केले. पोस्टरच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी अर्थविषयक संकल्पना सोप्या भाषेत मांडल्याने कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला.
प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड यांनी अशा प्रकारच्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि विचारशक्तीमध्ये सुधारणा होऊन समाजाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोण विकसित होतो असे मत मांडले. प्रा.डॉ. आर. के. पाटील यांनी विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या पोस्टरमध्ये सादरीकरण करताना विषयांची निवड आणि पोस्टरची निर्मिती कशी करावी, कोण कोणत्या घटकांकडे लक्ष द्यावे याबाबत मार्गदर्शन केले. सांगोला महाविद्यालयातील प्र. प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी पोस्टरसाठी विषयाची निवड आणि सादरीकरण कसे करावे याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या कार्यक्रमासाठी स्टुडन्ट अँड फॅकल्टी एक्सचेंज अंतर्गत डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.एस. बी. शिंदे आणि विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एम.डी.वेदपाठक यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापिका सौ.एस.एस.भुंजे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. पी.डी.गोडसे यांनी केले. या पोस्टरच्या प्रकाशनासाठी सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. एस. एन. कदम, सेक्रेटरी डॉ.अमोल खाडे, श्री.संत दामाजी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.पी.एम.होनराव, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. बी एस.गायकवाड,शिक्षकेत्तर कर्मचारी आणी विद्यार्थी उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्था अध्यक्ष मा. श्री.बाबूरावजी गायकवाड, उपाध्यक्ष मा.श्री.ता.ना.केदार, उपाध्यक्ष मा.प्रा.पी.सी.झपके, खजिनदार मा.श्री. नागेश गुळमिरे, सचिव, ॲड.उदय(बापू) घोंगडे, सहसचिव मा.श्री. साहेबराव ढेकळे, सर्व संस्था पदाधिकारी व सदस्य, प्राचार्य,डॉ. एस. आर. भोसले, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. आर.जी पवार, कार्यालयीन अधिक्षक श्री.विलास माने, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
