Breaking

Friday, 26 December 2025

आपुलकी प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर!




श्रीमती कृष्णाबाई खटकाळे, तानाजी सांगोलकर, बसवेश्‍वर झाडबुके, वैभव गलांडे, न्यू स्टार गणेश मंडळ, तिप्पेहळी यंदाचे मानकरी

सांगोला (प्रतिनिधी) -

आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यावर्षी श्रीमती कृष्णाबाई आगतराव खटकाळे, तानाजी नामदेव सांगोलकर, बसवेश्‍वर गुंडाप्पा झाडबुके, वैभव विठ्ठल गलांडे व न्यू स्टार गणेश तरुण मंडळ, तिप्पेहाळी यांना 1 जानेवारी 2026 रोजी एका खास समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव व सचिव संतोष महिमकर यांनी दिली.


पतीच्या निधनानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत हार न मानता, खचून न जाता, मोठे कष्ट घेवून आपल्या मुलांना शिक्षण देवून, वेळोवेळी प्रोत्साहन देत मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी अविरत कष्ट घेवून समाजापुढे आदर्श निर्माण केलेल्या श्रीमती कृष्णाबाई आगतराव खटकाळे यांना कृतिशील आदर्श माता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 20 एकरात 11 हजार डाळिंब झाडांची लागवड करुन प्रत्येक वर्षी भरघोस असे उत्पन्न मिळवण्यात यशस्वी होवून उच्च प्रतीचे डाळिंब उत्पादक शेतकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले तसेच परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणारे बलवडी येथील तानाजी नामदेव सांगोलकर यांना सृजनशील शेतकरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

व्यसनमुक्ती चळवळीचे प्रणेते ह.भ.प.बंडातात्या कराडकर महाराज यांच्या चळवळीत सक्रीय सहभाग घेवून व्यसनमुक्तीसाठी बहुमोल कार्य करणारे, त्याचबरोबर गोहत्या बंदी चळवळीतही मोलाचे कार्य करणारे, अप्रुका नदीतील चिलार, गाळ काढणेकामी सक्रीय सहभाग घेवून नदी स्वच्छता अभियानातही योगदान देवून वयाच्या एक्काहत्तरीत तेवढ्याच उत्साहाने सामाजिक कार्य करत असलेले मेडशिंगी येथील बसवेश्‍वर गुंडाप्पा झाडबुके यांना समाजसेवा प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर लहान वयात एका दुर्दैवी अपघातात दोन्ही हात गमवावे लागलेल्या व अशाही परिस्थितीत हार न मानता,शिक्षणाला महत्व देवून कुटुंबियांच्या सहकार्याने येणार्‍या अडीअडचणींना तोंड देत जिद्दीने मार्गक्रमण करत असलेल्या एखतपूर येथील वैभव विठ्ठल गलांडे यास सार्थ स्वाभिमान पुरस्कार जाहीर झाला आहे.

गणेशउत्सवाच्या माध्यमातून शिल्लक राहिलेल्या रक्कमेतून शाळेसाठी 5 गुंठे जागा उपलब्ध करुन सुसज्ज अशी संगणक व इतर सुविधा असलेली इमारत उभी करत शिक्षणाची सोय करणार्‍या, त्याचबरोबर गणेश मंदिराचे काम करुन धार्मिक क्षेत्रातही सहभाग नोंदवलेल्या, रक्तदान शिबिर, एक हात मदतीचा, गरजूंना किराणा वाटप, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करत असलेल्या सातकी वस्ती,तिप्पेहळी येथील न्यू स्टार गणेश तरुण मंडळास आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

या पुरस्कारांचे वितरण आपुलकी प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनी 1 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता सदानंद मल्टिपर्पज हॉल, मिरज रोड, सांगोला येथे मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाणार असल्याचे अध्यक्ष राजेंद्र यादव व सचिव संतोष महिमकर यांनी सांगितले.