70 जणांचा जमाव घरी पाठवून कुटुंबाला धमकावल्याचा माजी उपसभापतींचा गंभीर आरोप**
सांगोला । प्रतिनिधी
सांगोला तालुक्यात खळबळ उडवणारा प्रकार समोर आला असून, सांगोला विधानसभेचे आमदार बाबासाहेब देशमुख व त्यांच्या समवेत आलेल्या 60 ते 70 जणांनी घरी येऊन मारहाण, शिवीगाळ व दहशत निर्माण केल्याचा गंभीर आरोप माजी उपसभापती श्री. नारायण शिवाजी जगताप यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी सांगोला पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी दूरध्वनी करून चहा प्यायला येतो असे सांगितले होते. त्यानुसार अर्जदारांनी त्यांना येण्यास सांगितले. मात्र सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास आमदार त्यांच्या सोबत 60-70 जणांचा जमाव घेऊन थेट घरात दाखल झाले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या वेळी आमदारांनी अर्जदारांच्या मुलांबाबत तक्रार करत आक्रमक भूमिका घेतली. आपण मध्यस्थी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असता, आमदारांनी मी मुंबईला जातो, पण माझे लोक तुमचे काय करतात ते बघा अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर जमावातील काही जणांनी अर्जदारांची धरपकड करत पत्नी व मुलाबाबत अश्लील शिवीगाळ केली, तसेच कुटुंब पूर्णपणे उध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मला किंवा माझ्या कुटुंबाला काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास आमदार बाबासाहेब देशमुख व प्रशासन जबाबदार राहील, असेही अर्जदारांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे सांगोला तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, आमदारासारख्या लोकप्रतिनिधीवरच जर नागरिक सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अर्जदारांनी केली आहे.
या तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी सोलापूर, पोलीस अधीक्षक सोलापूर व उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांच्याकडेही पाठवण्यात आल्या आहेत.
