Breaking

Wednesday, 19 November 2025

अजनाळे ते सोनार सिद्ध मंदिर रस्ता काटेरी झुडपातुनमुक्त; सरपंच दिपाली लाडे यांच्या पुढाकाराने अजनाळे गावात विकासकामांना गती...

 


अजनाळे प्रतिनिधी 

अजनाळे ते सोनार सिद्ध मंदिर हा गावातील महत्त्वाचा मार्ग अनेक वर्षापासून काटेरी झुडपांनी व्यापला होता. या झुडपांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत होते आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या परिस्थितीची नोंद घेत अजनाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच दिपाली लाडे यांनी तातडीने कार्यवाही करत रस्ता पूर्णपणे झुडपमुक्त करण्याचे काम हाती घेतले.या रस्त्यावरून शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. झुडपांमुळे दृश्यमानता कमी होऊन अपघाताची शक्यता वाढत होती. रस्ता झुडपमुक्त झाल्याने वाहतुकीचा मार्ग सुकर झाला असून नागरिकांनी आता सहजपणे या मार्गाचा वापर सुरू केला आहे.सरपंच दिपाली लाडे यांची तीन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत सरपंचपदी निवड झाली. कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी गावातील मूलभूत गरजांकडे प्राधान्य देत विविध विकासकामांना गती दिली. त्यात रस्त्यासंबंधित सुधारणा, स्वच्छता उपक्रम, सार्वजनिक ठिकाणांची देखरेख, आणि आवश्यक सेवा-सुविधांची मजबुतीकरण यांचा समावेश आहे.

रस्ता मोकळा करण्याची मोहीम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली. उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर, वेळेत निर्णय आणि कामाची अंमलबजावणी यामुळे या उपक्रमाला वेग मिळाला. रस्ता स्वच्छ झाल्यानंतर नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर झाला आहे.

रस्त्याचे झुडप निर्मूलन हे आगामी विकास योजनांच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. गावातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आणि दीर्घकालीन विकास आराखड्यासाठी हा उपक्रम दिशा दर्शक ठरत आहे. निकट भविष्यात ग्रामपंचायत आणखी काही प्राधान्याच्या कामांना चालना देणारअसल्याची माहिती सरपंच दिपाली लाडे यांनी दिली.