Breaking

Tuesday, 11 November 2025

सांगोला नगरपालिका निवडणूक प्रक्रिया शांततेत सुरू : निवडणूक निर्णय अधिकारी सैफन नदाफ

 


11 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवस

सांगोला /प्रतिनिधी: 



सांगोला नगरपालिका निवडणूक प्रक्रिया 10 नोव्हेंबर पासून सुरू झाली असून 2  डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 11 प्रभागातून 23 उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र उमेदवार निवडला जाणार आहे. सांगोला नगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार यांनी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नियम व अटींचे पालन करावे. नगरपालिका निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र 10 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत भरता येणार आहेत. दिनांक 18 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर आहे. 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. 2 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान  होणार असून 3 डिसेंबर 2025 रोजी मतदान मोजणी होणार आहे. अशी माहिती सांगोला नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी सैफन नदाफ यांनी दिली आहे. 

निवडणुकीच्या दृष्टीने विविध प्रकारच्या परवान्या तहसील कार्यालयामध्ये स्वतंत्र विभागात देण्यात येणार आहेत. नगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षातील  पदाधिकारी, कार्यकर्त्यांना तसेच अपक्ष उमेदवारांसाठी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात आले आहे. राजकीय पक्षांना प्रत्येक प्रभागांमध्ये 1 पक्ष कार्यालय सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. मतदानाच्या दृष्टीने बुथनिहाय यंत्रणा, अधिकारी नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. पक्ष कार्यालयासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये परवानगी घ्यावी लागेल. अपक्ष उमेदवारासाठी सूचकाने थकबाकी भरणे बंधनकारक नाही .उमेदवारी अर्ज दाखल करताना सूचक व्यक्तीने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर अर्जावर सही करणे तसेच अशिक्षित सूचकाने निवडणुक निर्णय अधिकार्‍यासमोर आपल्या अंगठ्याचा ठसा देणे बंधनकारक आहे. 

सांगोला नगरपालिका निवडणूक 2025 साठी सर्व शासकीय यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. उमेदवारांनी आपले परिपूर्ण अर्ज वेळेत तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करावेत व निवडणूक वेळापत्रकाप्रमाणे सर्व प्रक्रिया वेळेवर पार पाडण्याच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करावे असे सांगोला नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी सैफन नदाफ  यांनी स्पष्ट केले आहे.