Breaking

Sunday, 26 October 2025

रासपचे प्रमुख माजी मंत्री महादेव जानकर यांच्याकडून दैनिक सांगोला नगरीचे संपादक सतीशभाऊ सावंत यांना वर्धापनदिन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी शुभेच्छा

 


दैनिक सांगोला नगरी वृत्तपत्रातील संपादक सतीश सावंत यांचे योगदान प्रेरणादायी

शेतकर्‍याच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन शेती, उद्योगधंदा, नोकरी क्षेत्रात उतरले पाहिजे

सांगोला /प्रतिनिधी :



 दैनिक सांगोला नगरी वर्तमानपत्राचा बारावा वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख माजी मंत्री महादेवजी जानकर यांनी उपस्थित राहून दैनिक सांगोला नगरीचे संपादक सतीशभाऊ सावंत यांना सदिच्छा दिल्या. 

यावेळी महादेव जानकर म्हणाले, या भागातील शेतकरी, उद्योजक, युवकवर्ग, महिला यांच्यासाठी सतीशभाऊ सावंत यांनी दैनिक सांगोला नगरी व दैनिक माणदेश नगरीच्या माध्यमातून केलेले कार्य लाख मोलाचे आहे. बहुजन समाजातला तरुण संपादक लोकांच्या व्यथा समस्या सोडवण्यासाठी पुढे आला हे कौतुकाचे आहे. महाराष्ट्रात गेले तीन महिने प्रबोधन करीत मेळावे घेत आहोत. जनजागृती करणे हे सध्या कार्य हाती घेतले आहे. या राज्याचा, देशाचा शेतकरी हा मालक असताना आज तो नोकर म्हणून जगत आहे. तो आर्थिक विवंचनेत आहे. शेतकर्‍याच्या मुलांनी शेतीबरोबर उद्योगधंदा केला पाहिजे. तरच आपले भले होणार आहे.बहुजन समाजाची पोरं उच्च शिक्षित झाली पाहिजेत. क्लासवन अधिकारी झाली पाहिजेत. तरच आपल्या समाजाला न्याय मिळेल सध्या शेतकर्‍याला कमी नफा व व्यापारी वर्गाला मोठा नफा मिळतो. शेतकर्‍याला न्याय मिळाला पाहिजे. शेती व शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. शेतकर्‍याच्या मुलांना मोफत शिक्षण दिले पाहिजे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे लोन व इतर स्कीमचे लोन माफ झाले पाहिजे. सरकारने शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे दिलेले आश्‍वासन पूर्ण करावे. गोरगरीब जनतेचे, शेतकर्‍यांचे कर्ज माफ करा .अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तुटपुंजी मदत शासनाने दिली आहे. मी दुग्धविकास मंत्री असताना दुधाला चांगला दर दिला होता . प्रसारमाध्यमांमध्ये रिपोर्टर न होता संपादक व्हावं. जैन समाजाचा आदर्श आपण घेतला पाहिजे .मोठ मोठ्या क्षेत्रात, उद्योगधंद्यात जैन समाज आघाडीवर आहे. आज वर्तमानपत्र काढणं सोपं आहे पण चालवण्यासाठी खूप मेहनत करावी लागत असून आर्थिक नियोजन कसे करावे हा प्रश्‍न पडतो. राष्ट्रीय पातळीवरती आपला पेपर पोहोचला पाहिजे ही भूमिका उराशी बाळगावी. राज्यभर सरकारच्या कारभाराबद्दल जनजागृती करण्यासाठी मेळावे आयोजित केले जात आहेत. शेतकर्‍यांसाठी जे काही चांगलं करता येईल ते करावं. सत्ताधारी पक्षापासून नेहमी सावध राहिले पाहिजे ही आमची भूमिका आम्ही मांडत आहे. यासाठी चांगला प्रतिसाद ही मिळत आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी दैनिक सांगोला नगरी वृत्तपत्राच्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी केले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.