*पैशाच्या ताकतीपुढे जनसंपर्क हतबल; ज्याच्याकडे पैसा-ठेका त्याच्याकडेच निष्ठा, अनेक पक्षांत एकच स्थिती*
*आटपाडी प्रतिनिधी :
तालुक्यातील राजकारणात ठेकेदारांचा वाढता प्रभाव ही लोकशाहीसाठी गंभीर आणि चिंताजनक बाब असल्याची स्पष्ट प्रतिक्रिया आटपाडी तालुक्याचे भाजपा सोशल मीडिया प्रमुख आबासाहेब भानवसे यांनी व्यक्त केली आहे. सध्या पैशाच्या ताकदीपुढे जनसंपर्क, निष्ठा आणि कार्यकर्त्यांचे योगदान दुय्यम ठरत असल्याचे वास्तव दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पूर्वी राजकारणात जनतेशी असलेला जिव्हाळा, विचारधारा आणि सामाजिक बांधिलकी या गोष्टींना महत्त्व होते. गावोगावी कार्यकर्ते लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेत होते. मात्र आता परिस्थिती बदलत असून, ज्याच्याकडे पैसा आणि ठेके आहेत, त्याच्याकडेच निष्ठा वळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे अनेक वर्षे जनतेत काम करणारे निष्ठावान कार्यकर्ते आणि प्रामाणिक नेतृत्व मागे पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
भानवसे म्हणाले की, ठेकेदारीच्या माध्यमातून आर्थिक ताकद मिळवून काहीजण राजकारणात प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रवृत्तीमुळे जनतेच्या प्रश्नांपेक्षा आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक स्वार्थाला प्राधान्य दिले जात आहे. ही परिस्थिती केवळ एका पक्षापुरती मर्यादित नसून, भाजपा सह अनेक पक्षांत अशाच प्रकारची स्थिती दिसून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, पैशाच्या जोरावर निर्माण केलेला प्रभाव तात्पुरता असतो, मात्र जनतेच्या विश्वासावर उभे राहिलेले नेतृत्वच टिकाऊ असते. आटपाडी तालुक्यात जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांचे नेतृत्व हे जनसंपर्क आणि लोकविश्वासावर आधारित असल्याचे त्यांनी नमूद केले.
ठेकेदारीच्या पैशाच्या जोरावर राजकारणावर वर्चस्व निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न जनतेच्या विश्वासाला तडा देणारा आहे. आटपाडी तालुक्यातील जागरूक जनता अशा प्रवृत्तीला कधीही स्वीकारणार नाही आणि जनतेच्या विश्वासावर आधारित स्वच्छ राजकारणालाच भविष्यात पाठिंबा देईल, असा ठाम विश्वासही भानवसे यांनी व्यक्त केला.
